गौरींच्या मारेकऱ्यांना सचिनचे प्रशिक्षण; मारेकरी अनेक वेळा आले एकमेकांच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:18 AM2018-08-24T01:18:46+5:302018-08-24T01:20:26+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी अनेक वेळा एकमेकांच्या संपर्कात आले.

Sachin's training for Gauri killers | गौरींच्या मारेकऱ्यांना सचिनचे प्रशिक्षण; मारेकरी अनेक वेळा आले एकमेकांच्या संपर्कात

गौरींच्या मारेकऱ्यांना सचिनचे प्रशिक्षण; मारेकरी अनेक वेळा आले एकमेकांच्या संपर्कात

googlenewsNext
ठळक मुद्देचारही खुनांतील आरोपी एकमेकांच्या संपर्कात सीबीआय पथकाच्या चौकशीत धक्कादायक माहिती

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी अनेक वेळा एकमेकांच्या संपर्कात आले. मात्र, एकमेकांना ते मूळ नावाने संबोधत नसत. छोटा मियाँ, बडा भाई, भाई साहब, काका, मामा, दादा, बंधू अशा टोपणनावांनी ते एकमेकांना बोलत असत. एवढेच नव्हे तर गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला आरोपी शूटर अमोल काळे ऊर्फ भाईजी याला सचिन अंदुरे याने जालना मुक्कामी शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याची खळबळजनक माहिती सीबीआय पथकाच्या हाती लागली आहे.

देशभरात गाजलेले महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे एकमेकांशी जुळत असल्याचे समोर येत आहे. या हत्येमागे कडव्या हिंदुत्वादी विचारसरणीचे लोक असल्याचेही अधोरेखित होत आहे. त्यामुळे या खून प्रकरणावरील पडदा हटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

पोलीस दलातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. दाभोलकर हत्ये प्रकरणातील सीबीआयच्या पथकाने औरंगाबादेतून अटक केलेला संशयित आरोपी सचिन अंदुरे आणि महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक एटीएसने पकडलेला अमोल काळे यांची सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. अमोलने तपास पथकाला आपण औरंगाबाद आणि जालना येथे काही दिवस मुक्काम केल्याची खळबळजनक कबुली दिली आहे.

मूळ नावे आणि ओळखही लपविली
तपासात समोर आले आहे की, दाभोलकर, गौरी लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांचे मारेकरी अनेक वेळा एकमेकांच्या संपर्कात आले. मात्र, ते एकमेकांना मूळ नावाने कधीच बोलवीत नसत. छोटे मियाँ, बडा भाई, भाई साहब, काका, मामा, दादा, बंधू अशा टोपण नावांनी ते एकमेकांना संबोधत असत. विशेष म्हणजे ते एकमेकांना आपली मूळ ओळख देत नव्हते. भविष्यात पकडले गेलो तरी कुणालाच कुणाचे नाव, गाव, पत्ता व अन्य माहिती नसावी, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती.

जालन्यातून रसद
नालासोपारा येथे स्फोटक बाळगणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतसह अटक केलेल्या तिघांच्या चौकशीत जालन्याचा शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकरला यापूर्वीच एटीएसने अटक केली आहे. या दहशतवादी कारवायांसाठी पांगरकरकडून रसद पुरविली जात होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. आता दाभोलकरांचा संशयित मारेकरी सचिन अंदुरे व गौरी लंकेश यांचा संशयित मारेकरी अमोल काळे यांची जालन्यात भेट व प्रशिक्षण झाल्याचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. हा दुवा पांगरकरामार्फतच जुळून आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने पोलीस आता तपास करीत आहेत.

डॉक्टर म्हणजे सचिनच...
आता तपासात एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. औरंगाबादेत एका कापड दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करणारा सचिन अंदुरे हा दहशतवादी कृत्य करताना डॉक्टर म्हणून वावरत असावा. त्याला त्याचे हे अन्य सहकारी डॉक्टर म्हणूनच संबोधत व ओळखतात. अमोल काळेसह पकडलेल्या अन्य एका आरोपीला डॉक्टरचा म्हणून सचिनचा फोटो दाखविल्यानंतर त्यांनी लगेच हाच डॉक्टर असल्याचे ओळखले. डॉक्टरनेच प्रशिक्षण दिल्याचे आरोपीने चौकशीच्या वेळी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले़

डॉक्टर होऊन दिले प्रशिक्षण
सूत्रांच्या माहितीनुसार अमोल काळे याने कबुली जबाबात म्हटले की, ‘‘औरंगाबाद येथील एका तरुणाकडून आपल्याला गोळ्या झाडण्यापासून पसार होण्यापर्यंतच्या सर्व टिप्स मिळाल्या. मी औरंगाबाद येथे एका मंदिराच्या परिसरात येऊन थांबलो होतो, तेव्हा एक तरुण दुचाकीवर येऊन मला भेटला.’’ तपास अधिका-यांनी तो तरुण सचिन अंदुरे आहे का? असे विचारल्यावर मात्र अमोलने त्याचे नाव सांगितले नव्हते, असे उत्तर दिले. परंतु दुसºया दिवशी अमोल जालन्यात असताना, तोच तरुण त्याला जालना येथे सरकारी रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत येऊन भेटला होता़. तेव्हा आम्ही दोन तास चर्चा केली़ या चर्चेत त्याने शस्त्राविषयीची माहिती व अन्य बारकावे त्याला सांगितले, असे काळे याने तपास अधिकाºयांना सांगितले.

छायाचित्रावरून ओळखले

पोलिसांनी अमोलला सचिन अंदुरेचे छायचित्र दाखविले. छायाचित्रातील तरुण तोच असल्याचे सांगत अमोलने सचिनला ओळखले. सचिन आणि काळे या दोघांची भेट कधी झाली, याबाबतची माहिती देण्यास सूत्रांनी नकार दिला़ अमोल काळे याने तो जालना आणि औरंगाबाद येथे थांबल्याचे सांगितल्याने औरंगाबाद एटीएसला तो कोठे थांबला होता, याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बाबतीत औरंगाबाद एटीएसच्या अधिका-यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

Web Title: Sachin's training for Gauri killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.