विवादामुळे अडगळीत पडलेल्या गांधी भवनाचे ३५ लाख रुपये खर्च करून झाले नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:23 PM2018-10-02T13:23:27+5:302018-10-02T13:28:35+5:30

औरंगाबाद शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले गांधी भवन मागील काही वर्षांपासून विवादामुळे अडगळीत पडले होते.

Renewal by spending Rs 35 lakh on Gandhi Bhawan, a distraction due to controversy | विवादामुळे अडगळीत पडलेल्या गांधी भवनाचे ३५ लाख रुपये खर्च करून झाले नूतनीकरण

विवादामुळे अडगळीत पडलेल्या गांधी भवनाचे ३५ लाख रुपये खर्च करून झाले नूतनीकरण

googlenewsNext

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गांधीवादी नागरिकांनी एकत्र येऊन केंद्र आणि राज्य पातळीवर गांधी स्मारक निधी उभारण्यात आला. यातून राज्यात विविध ठिकाणी गांधी भवनांची उभारणी झाली. औरंगाबाद शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले गांधी भवन मागील काही वर्षांपासून विवादामुळे अडगळीत पडले होते. मात्र वर्षभरापूर्वी वाद मिटला. आता संपूर्ण इमारतीचे ३५ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांचे विचार प्रसारित करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी स्थापन करण्यात आला. याचे मुख्यालय पुणे शहरात आहे. या निधीच्या औरंगाबाद, बुलडाणा आणि नागपूर येथे शाखा आहेत. औरंगाबादेतील समर्थनगर येथील शाखेच्या इमारतीचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते २ आॅक्टोबर १९६४ रोजी झाले होते. तेव्हापासून ही वास्तू गांधी विचारांची वाहक होती. गांधी विचारांचे ग्रंथ, विचारमंथन, वैचारिक चर्चा याठिकाणी होत असत. मात्र मागील काही वर्षांपासून या भवनालाही वादविवादाची किनार मिळाली. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीनारायण जैस्वाल जोपर्यंत कामकाज पाहत होते, तोपर्यंत अनेक कार्यक्रम होत होते. मात्र वादामुळे त्यांनीही यातून लक्ष कमी केले. यातच गांधी भवनात ज्यांना भाड्याने जागा दिली होती त्यांनी कब्जा मिळविला होता. खोल्या पडू लागल्या होत्या. पावसाळ्यात इमारत गळत होती. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. यातच चालू वर्षाच्या सुरुवातीला न्यायालयीन वाद मिटला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या बाजूने निकाल लागला.  यानंतर स्थानिक शाखेचे सदस्य डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांच्याकडे गांधी भवनाचा कारभार देण्यात आला.

डॉ. गोर्डे यांनी पहिल्यांदा भाडेकरूंकडून इमारतीचा ताबा घेतला. तसेच मुख्य कार्यालयाला नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करून देऊन निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. यानुसार निधी उभा करण्याच्या बोलीवर डॉ. सप्तर्षी यांनी मुख्य कार्यालयाच्या निधीतील ३५ लाख रुपये दिले. यातून दोन सभागृह, कार्यालय आणि १७ खोल्यांचे दरवाजे, खिडक्या, फरशी बदलण्यात आली. वाळूने प्लास्टर करून रंग देण्यात आला. नव्याने स्वच्छतागृहे उभारली आहेत. पूर्ण भवनाला स्वतंत्र दरवाजा, कंपाऊंड तयार केले आहे. यामुळे १७ खोल्यांमध्ये ६० विद्यार्थी राहण्यास आले आहेत. आता भवनाला गतवैभव देऊन सतत सामाजिक प्रबोधन, गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती स्थानिक व्यवस्थापक डॉ. गोर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गांधी विचारांचे ग्रंथ उपलब्ध
गांधी भवनामध्ये महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या ग्रंथांसहित गांधी विचारांचे ग्रंथ वाचण्यास, खरेदी करण्यास ग्रंथालयात उपलब्ध होते. मागील अनेक वर्षांपासून हे ग्रंथालय बंद होते. आता ते सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात ग्रंथ उपलब्ध नाहीत. मात्र काही दिवसांत मुख्य कार्यालयाकडून ग्रंथ पाठविण्यात येणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा गांधी भवन वैचारिक वादविवाद, विचार, प्रसार, सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांनी गजबजणार असल्याचे डॉ. गोर्डे यांनी सांगितले.

Web Title: Renewal by spending Rs 35 lakh on Gandhi Bhawan, a distraction due to controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.