पॅकिंग कंपनीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:15 AM2018-05-17T01:15:29+5:302018-05-17T01:15:42+5:30

वाळूज एमआयडीसी बनकरवाडीतील लाकडी खोके व पॅलेट बनविणाऱ्या केदारनाथ पॅकिंग कंपनीला बुधवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

 Raging fire to the packing company | पॅकिंग कंपनीला भीषण आग

पॅकिंग कंपनीला भीषण आग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी बनकरवाडीतील लाकडी खोके व पॅलेट बनविणाऱ्या केदारनाथ पॅकिंग कंपनीला बुधवारी (दि.१६) पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वेगवेगळ्े यंत्रे, संगणक, लॅपटॉप, कच्चा माल व इतर साहित्य जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
संजय भाताडे व सचिन भाताडे बंधूंची वाळूज एमआयडीसीतील बनकरवाडी (गट नंबर ४१) येथे ही कंपनी आहे. कंपनीत जवळपास १२० कामगार असून, वाळूज एमआयडीसीसह इतर कंपन्यास येथून पॅकिंगसाठी बॉक्स व पॅलेटचा पुरवठा केला जातो. मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ५.३० वाजता काम बंद झाल्यानंतर रात्री ११.३० वाजेदरम्यान काही माल कंपनीत उतरवून कामगार घरी गेले. बुधवारी (दि.१६) पहाटे २ वाजेदरम्यान सुरक्षारक्षक रामहरी सोमाळे यांना कंपनीत आग लागल्याचे दिसून आले. सोमाळे यांनी ही माहिती कंपनीत राहणारे कामगार अमित सोनार यांना दिली. सोनार यांनी येऊन पाहिले असता आग चांगलीच भडकली होती. सोनार यांनी ही माहिती कंपनी मालक सचिन भाताडे यांना दिली.
अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीच्या ज्वाला व धुराचे लोळ आकाशाकडे झेपावत होते. इलेक्ट्रिक वायरिंग व बोर्ड जळाल्याने कंपनीसह लगतच्या सामान भरलेल्या दोन खोल्याही आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण उंबरे, स.फौजदार वडगावकर, पोहेकॉ. गणेश अंतरप यांनी घटनास्थळी जाऊन आगीची माहिती घेतली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कोट्यवधींचे नुकसान झाले. याप्रकरणी उशिरापर्यंत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. आगीत कंपनीतील जवळपास ४० यंत्रे, हिट प्लँट, वीज जनित्र खोली, महागडे रबरवूड, पाईनवूड, ओएसबी प्लायवूड, साधे प्लायवूड, रबरसीट, ताडपत्रीचे रोल, लाकडी, लोखंडी व रबरी कच्चा माल, कार्यालयातील कागदपत्रे, कंपनीचे पत्रे, वायर,फलक व इतर साहित्य जळून खाक झाले. अन्य दोन सामानाच्या खोल्यातील ४ संगणक, २ लॅपटॉप, ३ प्रिंटरसह सर्वच साहित्य जळाले आहे.
समयसूचकता दाखवून काही कामगारांनी मालाने भरून उभी असलेली तीन वाहने बाहेर काढल्याने बराच माल वाचला. या आगीत ६ ते ७ कोटींचे नुकसान झाल्याचा दावा कंपनी मालक सचिन भाताडे यांनी लोकमतशी बोलताना केला.

Web Title:  Raging fire to the packing company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.