बेशिस्त वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव आरटीओकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:31 PM2019-01-09T16:31:09+5:302019-01-09T16:34:05+5:30

दीड महिन्यात दोनशेहून अधिक वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव

Proposal to suspend driving licenses of unskilled motorists to RTO | बेशिस्त वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव आरटीओकडे 

बेशिस्त वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव आरटीओकडे 

googlenewsNext
ठळक मुद्दे२०० जणांवर होणार कारवाई  वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे पडले महागात

औरंगाबाद : वारंवार आवाहन करूनही वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या आणि मोबाईलवर बोलत दुचाकी पळविणाऱ्या वाहनचालकांचा वाहन परवाना (लायसन्स) निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दीड महिन्यात दोनशेहून अधिक वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने आरटीओ कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती समोर आली.  

याविषयी शहर वाहतूक पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाहतूक नियम न पाळल्याने रस्ता अपघात होतो, हे सर्वमान्य आहे. असे असताना अनेक वाहनचालक नियम न पाळता सुसाट वाहन पळविताना आढळतात. विशेषत: मोबाईलवर बोलत दुचाकी पळविणे आणि वाहतूक सिग्नल तोडून सुसाट जाणे सर्वाधिक धोकादायक आहे. ही बाब लक्षात घेऊन मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका, सिग्नल तोडून जाऊ नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने अनेकदा वर्तमानपत्रांतून केले जाते. एवढेच नव्हे तर चौकाचौकांत  वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारीही वाहनचालकांचे समुपदेशन करीत असतात.

मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्या वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गतवर्षी तब्बल ९७ हजार  नागरिकांना वाहतूक नियम मोडून वाहन चालविताना पकडण्यात आले. या वाहनचालकांकडून सव्वातीन कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला. असे असले तरी दंडात्मक कारवाईचा कोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याने त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या आदेशाने शहर वाहतूक विभागातर्फे  पहिल्या टप्प्यात मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्या आणि सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्याचे प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यास सुरुवात केली.

या अंतर्गत डिसेंबरपासून कालपर्यंत २१० वाहनचालकांना  मोबाईलवर बोलत दुचाकी चालविताना आणि सिग्नल तोडून जाताना पोलिसांनी पकडून त्यांचे लायसन्स जप्त केले. या वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पोलिसांतर्फे संबंधित परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एच.एस. भापकर यांनी दिली. 

आरटीओंना पोस्टाद्वारे पाठविले प्रस्ताव
पोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या काही वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स हे बाहेरील जिल्ह्यांतील असतात. ज्या जिल्ह्याच्या आरटीओंनी लायसन्स दिले, त्याच आरटीओ कार्यालयाकडे कारवाईसाठी लायसन्स पाठवावे लागते. ही बाब लक्षात घेऊन बाहेरील जिल्ह्यांतील आरटीओंना स्पीड पोस्टाने लायसन्स आणि प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सिडको वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांनी सांगितले.

Web Title: Proposal to suspend driving licenses of unskilled motorists to RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.