२०४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा सभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:26 AM2018-07-11T01:26:09+5:302018-07-11T01:26:41+5:30

महापालिकेत मागील १८ वर्षांपासून दैनिक वेतनावर काम करणा-या कर्मचा-यांना सेवेत कायम करा, असा अशासकीय ठराव बुधवारी होणा-या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.

Proposal for confirmation of 204 employees | २०४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा सभेत प्रस्ताव

२०४ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा सभेत प्रस्ताव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेत मागील १८ वर्षांपासून दैनिक वेतनावर काम करणा-या कर्मचा-यांना सेवेत कायम करा, असा अशासकीय ठराव बुधवारी होणा-या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. सोलापूर महापालिकेच्या धर्तीवर या कर्मचा-यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. १८ वर्षांपूर्वी २६८ कर्मचारी दैनिक वेतनावर होते. त्यातील ६४ कर्मचारी निवृत्तही झाले. काही जणांचा मृत्यूही झाला.
१९९९-२००० मध्ये महापालिकेने बॅक डोअर २६८ कर्मचाºयांची दैनिक वेतनावर नियुक्ती केली. ज्या पद्धतीने शासनाने १,१२४ कर्मचाºयांना सेवेत कायम केले त्याच पद्धतीने या कर्मचा-यांना कायम करता येईल, असे निकष लावण्यात आले होते. या कर्मचा-यांना घेताना आरक्षण, बिंदुनामावली आदी कोणतेच निकष गृहीत धरण्यात आले नाहीत. त्यामुळे आजपर्यंत शासनाने या कर्मचा-यांना कायम करण्यासंदर्भात हिरवी झेंडी दाखविली नाही. आज नाही, तर उद्या सेवेत कायम होऊ, या आशेवर कर्मचारी अत्यंत तुटपुंजा पगारावर काम करीत आहेत.
१९ जून १९९९ रोजी सर्वसाधारण सभेने प्रस्ताव क्रमांक ४३/४ मंजूर करीत शासनाकडे वर्ग ३ व ४ संवर्गातील एकूण १९१२ पदे मंजुरीसाठी पाठविली होती. शासनाने २००३ साली १,१२४ पदांना मान्यता दिली. मात्र, त्यावेळी शासनाने आस्थापना खर्च जास्त होत असल्याचे कारण दाखवत ७८८ पदनिर्मितीच्या प्रस्तावास दुस-या टप्प्यात मान्यता देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यातील २६८ दैनिक वेतनावरील कर्मचा-यांना कायम करण्यासाठी पदनिर्मितीचा फेरप्रस्ताव १९ आॅगस्ट २००४ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर २००६ ते २०१४ पर्यंत प्रत्येक वर्षी प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला.
पदाधिकारी, कामगार संघटनांनीही शासन स्तरावर निवेदने देऊन विनंती केली. मात्र, आजपर्यंत हा प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर करण्यात आलेला नाही. २६८ पैकी ६४ कर्मचारी मयत व सेवानिवृत्त झाले आहेत.
बुधवारी पुन्हा एक अशासकीय प्रस्ताव सभागृहनेता विकास जैन, सभापती राजू वैद्य यांनी मांडला आहे. त्यास उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, सीताराम सुरे, बापू घडमोडे, गजानन बारवाल यांनी अनुमोदन दिले आहे.

Web Title: Proposal for confirmation of 204 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.