४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर

By राम शिनगारे | Published: February 2, 2024 11:38 AM2024-02-02T11:38:42+5:302024-02-02T11:41:02+5:30

मुंबईच्या दौऱ्यावर गेलेले कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर तडकाफडकी निर्णय

...Pro-Chancellor removed in just 48 hours; Walmik Sarvade on leave due to facing insult | ४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर

४८ तासांमध्ये प्रकुलगुरूंचा काढला पदभार; अपमानास्पद वागणुकीमुळे वाल्मीक सरवदे रजेवर

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. वाल्मीक सरवदे यांची सोमवारी (दि.२९) सायंकाळी नियुक्ती केली होती. त्यास ४८ तास उलटताच डॉ. सरवदे यांचा पदभार कुलगुरूंच्या मुंबईतील बैठकीनंतर तडकाफडकी काढण्यात आला आहे. या अपमानास्पद वागणुकीमुळे डॉ. सरवदे यांनी पदभार सोडत चार दिवसांच्या रजेवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बदलांमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा डॉ. विजय फुलारी यांनी २५ जानेवारीला पदभार स्वीकारला. त्यानंतर २९ जानेवारीला सायंकाळी प्रकुलगुरूपदासह चार अधिष्ठातांची तात्पुरती नियुक्ती केली होती. त्यात प्रकुलगुरूपदी डॉ. वाल्मीक सरवदे यांची, तर अधिष्ठातापदी डॉ. महेंद्र शिरसाट, डॉ. संजय साळुंके, डॉ. वैशाली खापर्डे आणि डॉ. वीणा हुंबे यांची नियुक्ती केली आहे. या सर्व नियुक्त्या एका व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याची चर्चा आहे. हा निर्णय कोणालाही विश्वासात न घेता घेतल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पातळीवरही प्रचंड नाराजी होती. त्यातून मुंबईच्या दौऱ्यावर गेलेले कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीत पाचही जणांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. 

मात्र, कुलगुरू डॉ. फुलारी यांनी केवळ डॉ. सरवदे यांचाच पदभार काढून घेतला आहे. विद्यापीठाच्या अस्थापना विभागाने डॉ. सरवदे यांना कार्यमुक्त केल्याचे पत्र बुधवारी रात्री तयार करून ठेवले होते. ते पत्र गुरुवारी सकाळी ९:३० वाजता एका कर्मचाऱ्यांच्या हस्ते डॉ. सरवदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. अवघ्या ४८ तासांत तडकाफडकी पदभार काढल्यामुळे नाराज झालेले डॉ. सरवदे यांनी चार दिवसांची रजा घेत सुटीवर जाण्याचा निर्णय घेतला. याविषयी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर आणि डॉ. सरवदे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

गोपीनाथ मुंडे संस्थेत बैठक
सत्ताधारी पक्षातील एका गटाने व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिष्ठातांना गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेत बोलावून घेत बैठक घेत विद्यापीठातील बदलांवर चर्चा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

Web Title: ...Pro-Chancellor removed in just 48 hours; Walmik Sarvade on leave due to facing insult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.