मराठवाड्याचे खेळाडू गाजवत आहेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:48 AM2018-08-29T00:48:38+5:302018-08-29T18:23:12+5:30

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मराठवाड्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा हा लेखा-जोखा.

Players of Marathwada are playing national, international competition | मराठवाड्याचे खेळाडू गाजवत आहेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा

मराठवाड्याचे खेळाडू गाजवत आहेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा

- जयंत कुलकर्णी
औरंगाबाद : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा २९ आॅगस्ट हा जन्मदिन आहे. हा दिवस पूर्ण देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटविणाऱ्या मराठवाड्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा हा लेखा-जोखा.

कुस्तीपटू राहुल आवारे, अंकित बावणे, विजय झोल, श्वेता जाधव, जुळ्या बहिणी सिद्धी व रिद्धी हत्तेकर, १६ वर्षांखालील बास्केटबॉलपटू खुशी डोंगरे, लहान वयातच शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे, तलवारबाजी खेळातील अभय शिंदे, गिर्यारोहक मनीषा वाघमारे, ज्युदो खेळाडू शेख फरजाद, अ‍ॅथलेटिक्समधील अमर शिंदे या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करताना मराठवाड्याचे नाव उंचावले आहे.

मराठवाड्याचा दिग्गज पहिलवान राहुल आवारे याने यावर्षी एप्रिल महिन्यात, तर भीमपराक्रम करताना राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. दुखापतीमुळे राहुल आवारेला आशियाई स्पर्धेत खेळण्यापासून वंचित राहावे लागले होते. २00८ साली पुणे येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणा-या राहुल आवारे याने याआधी २00९ मध्ये ज्युनिअर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, याच वर्षी २१ व्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण, २0११ मध्ये ताश्कंद येथील एशियन चॅम्पियनशिपमध्ये कास्य व ५ वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियनचा बहुमान मिळवला आहे.

अंकित बावणे याच्या रूपाने मराठवाड्याला महाराष्ट्र आणि भारत अ संघाचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीत सातत्यपूर्वक धावांचा रतीब रचणा-या व २३ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणा-या अंकितने यावर्षी दक्षिण आफ्रिका अ, न्यूझीलंड अ आणि वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना सुरेख कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध २१ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणा-या श्वेता जाधवनेदेखील यावर्षी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चांगली कामगिरी केली होती. तसेच पश्चिम विभागीय संघाचे उपकर्णधार बनण्याचा बहुमान मिळवला आहे.

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार असणा-या विजय झोल याने महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील संघाचे नेतृत्व भूषवले होते. तसेच विजय हजारे करंडक आणि टी-२0 स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ठसा उमटवला आहे. मूळची परभणीची असणा-या औरंगाबादच्या मनीषा वाघमारे हिने यावर्षी मे महिन्यात जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम केला, अशी कामगिरी करणारी ती मराठवाड्यातील पहिली गिर्यारोहक आहे. लहान वयातच शिवछत्रपती पुरस्कार जिंकणारी पहिली औरंगाबादची खेळाडू ठरणाºया साक्षी चितलांगे हिने मंगोलिया येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.

सिद्धी व रिद्धी या जुळ्या बहिणींनी जिम्नॅस्टिकमध्ये प्रभावी कामगिरी केली. सिद्धी हत्तेकर हिने यावर्षी जकार्ता येथील ज्युनिअर आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच नवी दिल्ली येथील खेलो इंडियांतर्गत जिम्नॅस्टिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिची बहीण रिद्धी चौथ्या क्रमांकावर राहिली. २0१६ मध्ये इंचिआॅन येथील एरोबिक जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाºया ईशा महाजन हिला यावर्षी २0१५-२0१६ च्या कामगिरीसाठी यंदा प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी यानी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय जिम्नॅस्टिक संघाचे व्यवस्थापक व मार्गदर्शकपद भूषवले आहे, तर उदय डोंगरे यांनी सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. तलवारबाजीतील खेळाडू अभय शिंदे याने इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत दोन कास्यपदके जिंकण्याचा भीमपराक्रम केला.

ज्युदोत औरंगाबादेतील शेख फरजाद याने खेलो इंडियांतर्गत ज्युदो स्पर्धेत ८१ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले, तर मयुरी पवार आणि ज्योती मुकाडे यांनी खेलो इंडियातच सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करताना ठसा उमटवला. विशेष म्हणजे नेपाळविरुद्ध झालेल्या लढतीत औरंगाबाद येथील गोविंद शर्मा हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.

गतवर्षी १६ वर्षांखालील आशियाई बास्केटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना औरंगाबादच्या खुशी डोंगरे हिने निर्णायक योगदान दिले आहे. आता तिची १८ वर्षांखालील संभाव्य भारतीय संघात निवड झाली आहे. हॉकीत गतवर्षी सत्यम निकम याने राष्ट्रीय स्पर्धेत १९ महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे उपकर्णधारपद भूषवले होते. औरंगाबादचा दिग्गज अ‍ॅथलिट अमर शिंदे यानेदेखील प्रभावी कामगिरी करताना २0१६ सीनिअर राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत सुवर्णपदक जिंकले अहे. तसेच याच वर्षी त्याने अश्वमेध स्पर्धेत रिलेत रौप्यपदक जिंकले होते.

Web Title: Players of Marathwada are playing national, international competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.