सात वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर पालखी महामार्गासाठी जनहित याचिका

By प्रभुदास पाटोळे | Published: April 5, 2024 02:45 PM2024-04-05T14:45:41+5:302024-04-05T14:50:01+5:30

केंद्र शासनासह सर्व प्रतिवादींना नोटिसा; पुढील सुनावणी २ मे रोजी अपेक्षित

PIL for Paithan-Pandharpur Palkhi highway pending for seven years | सात वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर पालखी महामार्गासाठी जनहित याचिका

सात वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर पालखी महामार्गासाठी जनहित याचिका

छत्रपती संभाजीनगर : सुमारे ७ वर्षांपासून प्रलंबित असलेला पैठण-पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. आर. व्ही. घुगे आणि न्या. आर. एम. जोशी यांनी केंद्र शासनासह सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर २ मे रोजी पुढील सुनावणी अपेक्षित आहे.

सदरील मार्गाचे काम सुरू झाले तरी अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. रस्ते खोदल्यामुळे लोकांना धुळीचा व खड्ड्याचा त्रास होत आहे. अनेक ठिकाणी पूल पूर्ण झालेले नाहीत. पैठण-पंढरपूर मार्ग या भागातील लोकांच्या दळणवळणासाठी अत्यंत जवळचा व चांगला मार्ग ठरणार आहे. मुख्यतः वारकऱ्यांना पैठण ते पंढरपूर या वारीसाठी अत्यंत सुखकर मार्ग होणार आहे. परंतु, विविध कारणाने व संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पाटोदा येथील नागरिक महादेव नाना नागरगोजे तसेच हभप रामकृष्ण गणपतराव रंधवे, चक्रपाणी लक्ष्मणराव जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बीडचे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग माजलगावचे सहायक अभियंता यांना वारंवार निवेदने देऊन सदरील काम लवकरात लवकर करावे, अशी विनंती केली होती.

यापूर्वी या रोडसाठी काॅ. नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व मोर्चेही काढण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदर काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे लोकांचे अतोनात हाल होत असल्यामुळे उपरोक्त तिघांनी ॲड. नरसिंह ल. जाधव यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ॲड. जाधव यांना ॲड. राकेश ब्राह्मणकर सहकार्य करीत आहेत.

सात वर्षांपूर्वी सुरू झालेले काम अद्याप अपूर्णच
पैठण-पंढरपूर पालखी मार्ग २०१७ला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला. सदरील कामाच्या निविदा निघून काम सुरू करण्यात आले होते. सदरील ७५२ राष्ट्रीय महामार्ग पैठण, मुंगी, बोधेगाव, घोणसपारगाव, उखंडाचकला, बीड, सांगवी, शिरूर कासार, राक्षसभुवन, खोल्याचीवाडी, कारेगाव, डोंगरकिन्ही, चुंबळी, पाटोदा पारगावघुमरा, दिघोळला जोडला जाऊन पुढे तो खर्डा मार्गे पंढरपूरकडे जाणार आहे.

Web Title: PIL for Paithan-Pandharpur Palkhi highway pending for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.