मनपाच्या आरोग्य केंद्रातील गरोदर महिलांसाठी उपयुक्त ७० हजार गोळ्या कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:01 PM2019-01-04T13:01:51+5:302019-01-04T13:06:31+5:30

गोळ्यांचा साठा डिसेंबर २०१८ मध्ये कालबाह्य होणार हे माहीत असूनही डब्याचे सीलही फोडले नाही

In one of AMC Health Center 70 thousand tablets are expired which are beneficial for pregnant women | मनपाच्या आरोग्य केंद्रातील गरोदर महिलांसाठी उपयुक्त ७० हजार गोळ्या कालबाह्य

मनपाच्या आरोग्य केंद्रातील गरोदर महिलांसाठी उपयुक्त ७० हजार गोळ्या कालबाह्य

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाच्या एका आरोग्य केंद्रातील प्रकार शहरात ३० पेक्षा अधिक आरोग्य केंद्र

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या ‘व्हिटॅमिन-३ डी’या गोळ्या राज्य शासनाकडून महापालिकेला मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. मागील वर्षीच आलेला साठा डिसेंबर २०१८ मध्ये कालबाह्य होणार हे माहीत असूनही त्याचा अजिबात वापर करण्यात आला नाही. चिकलठाणा आरोग्य केंद्रात तब्बल ७० हजार गोळ्यांचे बॉक्स पडून आहेत. महापालिकेच्या एका आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे. उर्वरित आरोग्य केंद्रांवर कालबाह्य औषधी किती आहे, याचा हिशेबच नाही.

मागील वर्षीच जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची औषधी कालबाह्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट राज्य शासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे  असतानाच महापालिकेच्या चिकलठाणा आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने २०१७ मध्ये महापालिकेला मोठ्या प्रमाणात ‘व्हिटॅमिन-३ डी’च्या गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्या गरोदर महिलांना देण्यात येतात. अतिशय उपयुक्त गोळ्यांचा वापर महापालिकेने न करता तो कालबाह्य होईपर्यंत तशाच ठेवल्या.

डब्याचे सीलही फोडले नाही

राज्य शासनाने दिलेल्या डब्याचे सीलही फोडण्यात आलेले नाहीत. प्रत्येक डब्यावर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने औषधी कधी कालबाह्य होणार हे ठळकपणे नमूद केले आहे. एकट्या चिकलठाणा आरोग्य केंद्रात तब्बल ७० ते ८० हजार गोळ्या कालबाह्य झालेल्या आहेत. महापालिकेतर्फे शहरात एकूण ३० आरोग्य केंद्र चालविण्यात येतात. उर्वरित प्रत्येक केंद्रावर किमान १० ते २० हजार गोळ्या पडून असतील, तर याची संख्या लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. औषधी कालबाह्य होण्यास जबाबदार असलेल्या दोषींवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: In one of AMC Health Center 70 thousand tablets are expired which are beneficial for pregnant women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.