काम न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:17 PM2019-05-21T23:17:37+5:302019-05-21T23:18:25+5:30

औरंगाबाद : क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी देऊन तीन महिने ...

Notice to the contractor who does not work | काम न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

काम न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देक्रांतीचौक पुतळा : उंची वाढविण्याचे काम सुरूच नाही


औरंगाबाद : क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी देऊन तीन महिने उलटले तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता कंत्राटदाराने काम सुरू करण्याआधीच पैशांची मागणी केली आहे. आधी पैसे द्या, नंतरच कामास सुरुवात करतो, अशी अडकाठी घातल्याने सत्ताधारी व प्रशासनाच्या अस्मितेला चांगलीच ठेच पोहोचली आहे. कंत्राटदाराला त्वरित नोटीस द्यावी, असे आदेश मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.
क्रांतीचौक येथे उड्डाणपूल झाल्यामुळे तेथील शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा झाकला गेला आहे. त्यामुळे शिवरायांच्या या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जात होती. त्यानुसार मागील वर्षी शिवजयंतीला या कामाचे भूमिपूजन केले. मात्र, वर्ष उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. स्थायी समितीने १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. गायत्री आर्किटेक यांना १ कोटी ८४ लाख ५३ हजार ५७२ रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार काम करण्यास मंजुरी देण्यात आली. काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, अद्यापही कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. मनपात सध्या कंत्राटदारांची बिले मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत. इतर कंत्राटदरांची अवस्था पाहून पुतळ्याचे काम करणाºया कंत्राटदाराने काम सुरू करण्याआधीच पैसे देण्याची मागणी मनपाकडे केली आहे. आधी पैसे द्या, नंतरच काम सुरू करतो, अशी मागणी कंत्राटदाराने केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर घोडेले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिली.
गुन्हा दाखल करण्याची सूचना
मनपाची आर्थिक स्थिती बरीच खराब आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी पालिका निधी कमी पडू देणार नाही. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी निधी देण्याचा शब्द दिला आहे. मात्र, कंत्राटदार अशी अडवणूक करून कंत्राट घेतल्यानंतर पालिकेची फसवणूक करीत असेल तर पालिका कंत्राटदारावर गुन्हा दाखल करीन, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

Web Title: Notice to the contractor who does not work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.