औरंगाबादमधील ‘मेडिकल टुरिझम’ला हवे ‘टेकआॅफ’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:24 PM2018-10-24T15:24:44+5:302018-10-24T15:28:41+5:30

मेडिकल टुरिझम वाढीसाठी विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Need Airline connectivity strength for 'Medical Tourism' in Aurangabad | औरंगाबादमधील ‘मेडिकल टुरिझम’ला हवे ‘टेकआॅफ’चे बळ

औरंगाबादमधील ‘मेडिकल टुरिझम’ला हवे ‘टेकआॅफ’चे बळ

googlenewsNext
ठळक मुद्देविमानसेवा वाढीकडे लक्ष देण्याची गरज  परदेशांतून उपचाराकरिता शहरात येण्यासाठी मिळावे प्रोत्साहन

औरंगाबाद : शहरात पुणे, मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. उपचाराचा खर्चही तुलनेत औरंगाबादेत कमी आहे. त्यामुळे औरंगाबादला मेडिकल टुरिझम खुणावत आहे; परंतु मर्यादित विमानसेवेमुळे त्यास खोडा बसतो. त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढीसाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरूआहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. एकेकाळी शहरातील बहुतांश हृदयरोगी उपचारासाठी पुणे-मुंबई येथे जात होते. मात्र, आता हृदयरोगावरील उपचार, अवयव प्रत्यारोपासह बहुतांश आजारांवरील उपचार शहरातच शक्य झाले आहेत. शहरात अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत. विविध रुग्णालयांमध्ये परदेशातून आजघडीला ४०० ते ५०० परदेशी रुग्ण दरवर्षी उपचारासाठी दाखल होतात. विशेषत: आखाती देशांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शहरात अधिक संख्येने परदेशी रुग्ण येण्यासाठी मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न हवे. त्यासाठी विमानसेवेत वाढ होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  
शासनाच्या अनास्थेमुळे औरंगाबादेत मेडिकल टुरिझम वाढीसाठी फारसे प्रयत्न होत नाही. सध्या परदेशी रुग्णांना शहरात आकर्षित करण्यासाठी केवळ रुग्णालयांकडून प्रयत्न होत आहेत; परंतु विमानसेवेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल,असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विमानसेवा वाढावी
वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने विमानसेवा वाढली पाहिजे. सोबतच शहरातील रस्त्यांचा आणि शहराचा विकास करण्याची गरज 
आहे. हा विकास झाला तरच मेडिकल टुरिझम वाढीला हातभार लागेल.
-डॉ. कुलदीपसिंग राऊळ,अध्यक्ष, आयएमए


ठराविक वेळेचे गणित
रुग्ण, डॉक्टर आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने विमानसेवेत वाढ झाली पाहिजे. हृदय, यकृतासारखे अवयव प्रत्यारोपण हे ठराविक वेळेच्या आत होणे गरजेचे असते. नोंदणी झालेल्या रुग्णाचे उपलब्ध अवयव गतीने हलविता आले पाहिजे.
-डॉ. अजय रोटे, सीईओ, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल

कनेक्टिव्हिटी महत्त्वाची
शहरात वैद्यकीय उपचाराचे दर मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमी आहे. सध्या आखाती देशांतून उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मेडिकल टुरिझम वाढीसाठी हवाई कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून त्यात वाढ झाली पाहिजे.
-डॉ. विकास देशमुख, अध्यक्ष, सर्जिकल सोसायटी 

Web Title: Need Airline connectivity strength for 'Medical Tourism' in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.