नोटाबंदी, राफेल, बँक घोटाळ्यांच्या अभ्यासाची भाजपाला भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:49 PM2018-11-29T23:49:49+5:302018-11-29T23:50:19+5:30

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंवर दबाव टाकून घोटाळ्याचा भाग अभ्यासक्रमातून बाद करण्यास भाग पाडल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्तेवर भाजपाने सेन्सॉर बसविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

 Nabha, Rafael, bank scandal, study fears BJP | नोटाबंदी, राफेल, बँक घोटाळ्यांच्या अभ्यासाची भाजपाला भीती

नोटाबंदी, राफेल, बँक घोटाळ्यांच्या अभ्यासाची भाजपाला भीती

googlenewsNext
ठळक मुद्दे स्वायत्ता कुंठित : कुलगुरूंवर दबाव टाकून मोदींच्या काळातील घोटाळे अभ्यासक्रमातून बाद

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीबीए अभ्यास मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांनी विद्यमान केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा समावेश अभ्यासक्रमात केला होता. नोटाबंदी, बँक घोटाळे, राफेल करार आदींचा समावेश असलेला अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकताच सोशल मीडियात व्हायरल झाला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंवर दबाव टाकून घोटाळ्याचा भाग अभ्यासक्रमातून बाद करण्यास भाग पाडल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्तेवर भाजपाने सेन्सॉर बसविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
बॅचलर आॅफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) या पदवीला कॉर्पोरेट गर्व्हनन्स- भाग २ हा विषय आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमात चौथे युनिट ‘केसेस आॅन कॉर्पोरेट गर्व्हनन्स इन इंडिया’ या नावाचे आहे. विद्यार्थ्यांना चालू घडामोडींवर केस स्टडी करता यावी, या हेतूने २०१४ नंतर बँकिंग क्षेत्रात झालेले विविध बदल अभ्यासासाठी ठेवण्यात आले होते. यात नोटाबंदी, राफेल करार, पंजाब नॅशनल बँक घोटाळा- नीरव मोदी, अमित मोदी, निशाल मोदी, मेहुल चौकसी आणि किंगफिशर घोटाळा- विजय मल्ल्या याचा समावेश केला. हा नवीन अभ्यासक्रम २६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. मात्र, काही वेळातच हा अभ्यासक्रम प्राध्यापकांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधून भाजपाच्या स्थानिक पदाधिकाºयांकडे पोहोचला. भाजपाचे शहराध्यक्ष किशनचंद तणवाणी यांनी केंद्रात, राज्यात भाजपाचे सरकार असताना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या सरकारच्या संबंधित बाबींचा समावेश कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित करीत हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी कुलगुरूंकडे केली. वगळला नाही तर याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या इशाºयामुळे कुलगुरूंनी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांना बोलावून घेत सर्व पार्श्वभूमी समजावून घेतली. हा अभ्यासक्रम भाजपा व अभाविप प्रणित विद्यापीठ विकास मंचच्या पॅनलमध्ये निवडून आलेले अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. ए. घुमरे, प्राचार्य डॉ. किशोर साळवे आणि डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी बनवला आहे. यात अभ्यासपूर्ण अशी रचना केली आहे. यात वादग्रस्त असे काहीही नसल्याचे डॉ. सरवदे यांनी कुलगुरूंकडे स्पष्ट केले. तरीही कुलगुरूंनी ज्यावर आक्षेप आहे, असा भाग वगळून टाकण्याचे आदेश दिले. यानुसार अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा एक बैठक घेत हा भाग वगळून टाकण्याचा निर्णय घेतला. नवीन भागात नोटाबंदी, बँक घोटाळे, कॉग्निटिव्ह मॉरल डेव्हलपमेंट आणि अकॉटॅबिलिटी इश्यू अ‍ॅण्ड कॉर्पोरेट गर्व्हनन्स या अभ्यासक्रमाचा समावेश केला. भाजपाच्या पदाधिकाºयांना राफेल, नोटाबंदी, बँक घोटाळ्याच्या अभ्यासाचीही भीती निर्माण झाली असल्याचा टोमणा उत्कर्ष पॅनलकडून निवडून आलेले विद्यापरिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांनी हाणला.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीपूर्वीच अभ्यासक्रमात बदल
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर खडाजंगी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, हा विषय व्यवस्थापन परिषदेत शेवटपर्यंत चर्चेला आलाच नाही. बैठक संपल्यानंतर एका सदस्याने भाजपाच्या घोटाळ्याचा समावेश असलेला अभ्यासक्रम सोशल मीडियात फिरत असल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कुलगुरूंनी हा वादग्रस्त भाग वगळण्याचा निर्णय अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी घेतला असल्याचे संबंधितांच्या निर्दशनास आणून दिल्याची माहिती या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title:  Nabha, Rafael, bank scandal, study fears BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.