‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’; वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली नव्या उपक्रमाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:40 PM2018-06-16T12:40:50+5:302018-06-16T15:03:38+5:30

‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’ हा नवा उपक्रम यंदा राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

'Mother's Tree' now, like 'mother's sari'; Forest Minister Mungantivar announced the new initiative | ‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’; वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली नव्या उपक्रमाची घोषणा

‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’; वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली नव्या उपक्रमाची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्दे यंदा राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट २ कोटी ९१ लाख रोपट्यांद्वारे मराठवाडा हिरवागार करणार

औरंगाबाद : ‘माहेरची साडी’प्रमाणे आता ‘माहेरची झाडी’ हा नवा उपक्रम यंदा राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यंदा राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, २ कोटी ९१ लाख रोपट्यांद्वारे मराठवाडा हिरवागार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

वनविभागाच्या वृक्षलागवडीसंदर्भात येथील वाल्मीमध्ये मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माहेरीची झाडीची संकल्पना स्पष्ट करताना वनमंत्री म्हणाले की, विवाहाच्या आधी मुलीने आपल्या घरी एक फळझाड लावावे. सासरी जाताना हे झाड तिची आठवण म्हणून राहील. माहेरी आल्यावर या झाडाची फळे तिला व तिच्या मुलांनाही मिळतील. यामुळे वृक्षलागवडीला प्रोत्साहन मिळेल.

मुनगंटीवार म्हणाले की, लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर नागरिक खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये तसेच शासनाच्या सर्वच विभागांना दिले आहे. इको बटालियनच्या माध्यमातून औरंगाबादेत ६५ हेक्टरवर वृक्षलागवड अत्यंत उत्तमप्रमाणे केली असून, यंदाचे त्यांचे उद्दिष्ट १०० हेक्टरवर करण्यात आले आहे. वनक्षेत्राच्या बाजूला असलेल्या गावात उज्ज्वला गॅस वितरण करून लाकूड कटाईवर पूर्णता बंदीच आणलेली आहे. 

वृक्षलागवडीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला असून, बांबूवरील टोल काढल्याने बांबू लागवड जोमात सुरू झाली असून, त्याचा फायदा महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढविणारा ठरणार आहे. बांबू बोर्ड स्थापन केला असून, रिसर्च सेंटरदेखील सुरू करण्यात आलेले आहे. पूर्वी बोटावर मोजण्याएवढ्या बांबूच्या प्रजाती होत्या, त्याची संख्या १२५० इतकी वाढली आहे. 

मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड इत्यादी परिसरातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहून ठराविक उद्दिष्ट जाहीर केले. ग्रामपंचायतीपासून नगरपंचायत, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्थाचा वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. 

बैठकीला पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक पी. के. महाजन आदींसह वन विभाग, तसेच अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

मुलगी जन्मल्यास १० रोपे भेट
शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला आली की, त्यास वन विभाग १० वृक्ष भेट देणार असून, त्यात फळझाडांचा समावेश असणार आहे. या झाडांमधून मिळणाऱ्या वार्षिक  उत्पन्नातून मुलीच्या पुस्तकाचा खर्च भागणार आहे. तुती रेशीम लागवड हेदेखील शेतकऱ्यांसाठी मिशन आहे. वन विभाग त्यासाठी लक्ष देणार आहे. नागरिकांनी गावागावात पर्यावरणप्रेमी सैनिक व्हावे, असे आवाहनही वनमंत्र्यांनी केले. 
 

वृक्ष कटाईसाठी टोलफ्री नंबर
झाड कटाई, आग, तसेच इतर कारणांसाठी टोलफ्री क्रमांक देण्यात आला असून, ४८ तासांत त्या ठिकाणी नागपूर मुख्यालयावरून मदत मिळेल. लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती रोपे जिवंत आहेत, याबाबतची नोंद दरवर्षी आॅक्टोबर व मे महिन्यात घेण्यात आली. ही आकडेवारी आॅनलाईन पद्धतीने संनियंत्रित करण्यात आल्याचेही यावेळी मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

तर विरोधकांना अर्थशास्त्राची पुस्तके देणार

विरोधकांना ४७ वर्षांत काही करता आले नाही आणि ते चार वर्षांत आमच्याकडून अपेक्षा करीत आहेत. आम्ही सादर केलेल्या आकडेवारीत त्यांना काहीही कळत नाही. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी अर्थशास्त्राची पुस्तके भाजपच्या वतीने भेट देणार आहोत, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. 

Web Title: 'Mother's Tree' now, like 'mother's sari'; Forest Minister Mungantivar announced the new initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.