इज्तेमाच्या संयोजकांनी जिंकले अथांग जनसागराचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:03 PM2018-02-27T13:03:40+5:302018-02-27T13:10:17+5:30

औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला.

The mind of the millions won by the organizers of Ijtema in Auranagabad | इज्तेमाच्या संयोजकांनी जिंकले अथांग जनसागराचे मन

इज्तेमाच्या संयोजकांनी जिंकले अथांग जनसागराचे मन

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणारा आणि अनेक विक्रम मोडणार्‍या राज्यस्तरीय इज्तेमाचा सोमवारी समारोप झाला. महाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या लाखो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले. साथींना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. संयोजकांनी या आदरातिथ्याने उपस्थित लाखो साथींची मनेही जिंकली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या नागरिकांच्या राहण्याची, जेवण, अंघोळ आदी व्यवस्था कशा पद्धतीने केली यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता संयोजन समितीच्या सदस्यांनी नमूद केले की, मागील सहा महिन्यांपासून जमीन ताब्यात घेणे, सपाटीकरण आदी कामे सुरू केली. शेतकर्‍यांचा कापूस वेचण्यासाठी महिला सापडत नव्हत्या. आजपासच्या गावांमध्ये आवाहन करून तब्बल एक हजार मुस्लिम महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण कापसाची वेचणी करून दिली.

आमीर साहब यांनी प्रत्येक जिल्ह्याला कामांची वाटणी करून दिली होती. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील जबाबदार लोक रात्रंदिवस काम करीत होते. २ हजार एकर परिसरात तब्बल २१ विहिरी होत्या. या विहिरींचे पाणी एका मोठ्या शेततळ्यात आणून टाकले. १ कोटीपेक्षा अधिक क्षमतेची आठ मोठी शेततळी उभारली. पाणी शुद्धीकरणासाठी संप उभारण्यात आले. वजूखाने, शौचालये, बाथरूमची संख्या जवळपास ५० हजरांपेक्षा जास्त होती. संपूर्ण वीजव्यवस्थेची जबाबदारी चिकलठाणा येथील सद्गृहस्थाने घेतली. 

नांदेड येथील तज्ज्ञ वास्तुविशारदाने संपूर्ण ड्रॉर्इंग तयार करून दिले. इज्तेमास्थळी तब्बल ५० कि.मी.च्या अंतर्गत पाण्याच्या लाईन टाकण्यात आल्या. ड्रेनेजव्यवस्थाही वेगळी करण्यात आली. अंघोळ, हातपाय धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याची वेगळी व्यवस्था करून ते परिसरात जिरविण्यात आले. त्यामुळे या भागातील विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुख्य मंडप ९१ लाख चौरस फुटांचा ठेवण्यात आला. त्यात ऐनवेळी वाढ करून तो १ कोटी ५ लाख चौरस फूट करण्यात आला. इज्तेमा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला. 

ऐहतेकाफ, रोजे
इज्तेमा यशस्वीतेसाठी ‘दुआ’ करण्यात काही साथी २४ तास मग्न होते. १७ साथी मुख्य मंडपात ऐहतेकाफमध्ये बसले होते. प्रत्येक जिल्ह्याच्या मंडपात ५ साथी ऐहतेकाफ आणि रोजे ठेवून होते. मागील तीन महिन्यांपासून ही त्यांची दिनचर्या होती.

विदेशी नागरिकांसाठी ए.सी. कक्ष
मुख्य मंडपापासून हाकेच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय साथींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. ३ हजार साथी थांबतील, अशी व्यवस्था तिथे होती. येथील कक्ष वातानुकूलित तयार केले होते. राज्यभरातून आलेल्या काही व्हीआयपी साथींसाठी कूलरसह बाजूलाच कक्ष केला होता.

पंढरपूर ट्रस्टचे पदाधिकारी आले
सोलापूर येथील पंढरपूर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी तीन दिवसांपूर्वीच इज्तेमास्थळी हजेरी लावली. दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. इज्तेमाप्रमाणे आम्हालाही सोयी-सुविधा देता येऊ शकतील का, याचा आढावा त्यांनी घेतला. संपूर्ण इज्तेमा स्थळ फिरून त्यांनी पाहणी केल्याचे संयोजकांनी सांगितले.

Web Title: The mind of the millions won by the organizers of Ijtema in Auranagabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.