मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण ‘खड्ड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:45 PM2018-01-11T23:45:51+5:302018-01-11T23:48:21+5:30

गेल्या तीन वर्षांपासून खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याचे काम न झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून केवळ रस्ता चांगला नसल्याने पर्यटकांनी म्हैसमाळकडे पाठ फिरवली आहे.

 Marathwada cooling station | मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण ‘खड्ड्यात’

मराठवाड्याचे थंड हवेचे ठिकाण ‘खड्ड्यात’

googlenewsNext

सुनील घोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : गेल्या तीन वर्षांपासून खुलताबाद ते म्हैसमाळ रस्त्याचे काम न झाल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून केवळ रस्ता चांगला नसल्याने पर्यटकांनी म्हैसमाळकडे पाठ फिरवली आहे. राज्य शासनाने म्हैसमाळ, शूलीभंजन, खुलताबाद पर्यटन प्राधिकरण स्थापन केले असून यासाठी जवळपास ४५० कोटी रुपये मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यात १२८ कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू होत नसल्याने पर्यटकांसह म्हैसमाळ ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ, शूलीभंजन, खुलताबाद आदी ठिकाणच्या पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी पर्यटन प्राधिकरण स्थापन केले. पर्यटन प्राधिकरणासाठी जवळपास ४५० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली.
पहिल्या टप्प्यासाठी १२८ कोटी रुपये मंजूर केले. या रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने नाराजी वाढली आहे.
रस्ता मृत्यूपंथाला
खुलताबाद ते म्हैसमाळ या ११ कि.मी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तर रस्त्याची डागडुजी सुध्दा करण्यात आली नाही.
त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून मोठमोठी खड्डे पडली आहेत. म्हैसमाळ घाट व घाटाच्यावर तर रस्त्यात भगदाड पडल्याचे दिसत आहे.
या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शिवाय वाहने नादुरूस्त होत असल्याने पर्यटकांनी मराठवाड्याच्या या थंड हवेच्या ठिकाणाकडे पाठ फिरविली आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने पर्यटकांवर आधारित व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
म्हैसमाळची यात्रा ३० जानेवारीला
म्हैसमाळ येथील गिरिजादेवीची यात्रा ३० जानेवारीपासून सुरू होत असून जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी येत असतात. परंतु रस्त्याची आजची स्थिती बघता भाविक येतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात्रेसाठी तरी म्हैसमाळ रस्त्याची डागडुजी करण्यात यावी म्हणून गिरिजादेवी मंदिर देवस्थान, म्हैसमाळ ग्रामपंचायतीने तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम उपविभाग खुलताबाद यांना पत्र दिले असून यात्रेच्या अगोदर खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.
१० मिनिटांसाठी लागतात ४५ मिनिटे
खुलताबाद ते म्हैसमाळ या ११ कि.मी. रस्त्याची चाळणी झाल्याने चारचाकी वाहनास जाण्यासाठी किमान ४५ मिनिटे लागतात. अत्यंत हळुवारपणे गाडी चालवावी लागत असल्याने पर्यटक म्हैसमाळला जाणे टाळत आहेत.
प्राधिकरणाच्या फेºयात अडकला रस्ता
म्हैसमाळ रस्ता हा पर्यटन प्राधिकरण विकास कार्यक्रमात समाविष्ठ असल्याने या रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने सांगितले आहे. मात्र पर्यटन प्राधिकरणाचे कामही सुरू होत नसल्याने हा रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे.
च्खुलताबाद ते म्हैसमाळ, जटवाडा ते काटशिवरी फाटा या तालुक्यातील दोन प्रमुख रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ १२ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नवीन वर्ष उलटले तरीही हालचाली दिसत नाही. म्हैसमाळ रस्त्यासाठी ४० कोटी तर जटवाडा ते काटशिवरी फाटा रस्त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर असून निविदाही काढल्याचे समजते.
रस्ते धड नाही, म्हणे पर्यटन जिल्हा
च्राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यास पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला असला तरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्तेच खड्डेयुक्त झाले आहेत. यात खुलताबाद- म्हैसमाळ, खुलताबाद - फुलंब्री, कसाबखेडा ते वेरूळ, जटवाडा ते काटशिवरी फाटा या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची नितांत गरज आहे. देश -विदेशी पर्यटकांना किमान रस्ते तरी चांगले दिसले पाहिजे. इतर सोयी -सुविधांचाही अभावच आहे.

Web Title:  Marathwada cooling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.