माणिक हॉस्पिटल आगीत युवकाच्या सतर्कतेने वाचले अनेकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 08:03 PM2018-04-04T20:03:36+5:302018-04-04T20:06:45+5:30

माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी घडलेल्या आगीच्या घटनेत अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली; परंतु एक युवक रुग्णांसाठी देवदूतच ठरला.

Many people have read the Manik Hospital fire in the alert of the youth | माणिक हॉस्पिटल आगीत युवकाच्या सतर्कतेने वाचले अनेकांचे प्राण

माणिक हॉस्पिटल आगीत युवकाच्या सतर्कतेने वाचले अनेकांचे प्राण

googlenewsNext

औरंगाबाद : माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी घडलेल्या आगीच्या घटनेत अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली; परंतु एक युवक रुग्णांसाठी देवदूतच ठरला. आग लागल्याची माहिती मिळताच स्वत:चे कार्यालय सोडून त्याने रुग्णालयाकडे धाव घेतली आणि अग्निशमन पथक पोहोचण्यापूर्वी चार टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. त्याच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले.

सलमान नवाब पटेल असे या युवकाचे नाव आहे. सलमानचे माणिक हॉस्पिटलजवळच लेबर कॉन्ट्रॅक्ट कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे तो सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्यालयात होता. आज एखाद्या अपघाताच्या घटनेला सामोरे जाण्याची वेळ येईल, असे त्याला वाटलेही नव्हते. अचानक त्याचे वडील नवाब पटेल हे धावतच कार्यालयात आले आणि माणिक हॉस्पिटलला आग लागल्याचे सांगितले. वडिलांचे शब्द ऐकताच कसलाही विचार न करता त्याने सरळ या रुग्णालयाकडे धाव घेतली. थेट ज्या ठिकाणी आग लागली होती तेथे पोहोचला. पाठोपाठ त्याचे वडीलही पोहोचले.  

कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्याचे शब्द कानी पडताच सलमानने अग्निशमन विभागाला फोन केला. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेत तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. परिसरातील टँकर घेऊन थेट रुग्णालयात पोहोचला. चार टँकरच्या मदतीने सलमानने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नामुळे सगळ्यात आधी आग आटोक्यात येण्यास मदत झाली. आगीवर नियंत्रण आले; परंतु धुरामुळे रुग्ण रुग्णालयात अडकले होते. त्यामुळे आग विझविण्यापुरतेच न थांबता जवळच बांधकाम सुरू असलेल्या एका जागेवरून आणलेल्या शिडीच्या मदतीने सलमान पटेलने रुग्णांना खिडकीतून बाहेर काढणे सुरू केले. 

१५ मिनिटांनी अग्निशमन पथक पोहोचले
सलमानसह अनेकांनी मदतीसाठी प्रयत्न केले; परंतु यामध्ये सगळ्यात आधी मदतीसाठी धाव घेणाऱ्या सलमान पटेलच्या दक्षतेमुळे अनेकांचे जीव सुखरूप राहिले. गारखेड्यातील युवकांसह अनेकांनी मदत केली. सलमानने फोन केल्यानंतर जवळपास १५ मिनिटांनी अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आगीवर आणि धुरावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सगळ्यांच्या मदतीनेच रुग्णांचे जीव वाचल्याचे सलमान पटेल म्हणाला.

Web Title: Many people have read the Manik Hospital fire in the alert of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.