चार महिन्यांपासून प्लॅटफॉर्म ठेवला खोदून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:45 PM2019-07-11T18:45:14+5:302019-07-11T18:54:06+5:30

मॉडेल रेल्वेस्टेशनच्या विकासाला खीळ

Keeping the platform for four months after digging | चार महिन्यांपासून प्लॅटफॉर्म ठेवला खोदून 

चार महिन्यांपासून प्लॅटफॉर्म ठेवला खोदून 

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतील मॉडेल रेल्वेस्टेशनच्या विकासाला ‘खीळ’ बसली आहे. तीन वर्षांपासून मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक चार आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविला जाणार आहे. मात्र, चार महिन्यांपासून फक्त प्लॅटफॉर्म खोदून ठेवण्यात आला आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी मार्च महिन्यात रेल्वेस्टेशनच्या पाहणीप्रसंगी मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सहा महिन्यांत सुरू होणार असल्याचे सांगितले. परंतु जुलै महिना उजाडला. अजूनही कामाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या पहिल्या टप्प्यात नवीन इमारत बांधण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीचा विकास केला जाणार आहे. मात्र, हे काम तीन वर्षांपासून कागदावरच आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम रेल्वेच्या राईटस् कन्सल्टिंग या एजन्सीच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगण्यात आले होते. भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात झालेली नाही.

डेक्कन ओडिसीतून औरंगाबादेत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले जाणार आहे. फेब्रुवारीत कामाला सुरुवात झाली. मात्र, चार महिन्यांत हा प्लॅटफॉर्म खोदून ठेवण्यात आला आहे. काही कॉलम उभे करण्यात आले. प्रत्यक्षात काम पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. प्लॅटफॉर्मच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. याविषयी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


फक्त घोषणा; कामे शून्य
रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये नव्या इमारतीसमोर वेरूळ लेणीतील शिल्पांची उभारणी, अजिंठा-वेरूळ लेण्यांना नजरेसमोर ठेवून प्रवेशद्वाराची उभारणी केली जाणार आहे. पाहणी दौऱ्यात केवळ माहिती देऊन, घोषणा करून रेल्वे अधिकारी प्रत्यक्षात रेल्वेस्टेशनच्या विकासकामांकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Keeping the platform for four months after digging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.