छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

By विजय सरवदे | Published: March 28, 2024 11:26 AM2024-03-28T11:26:50+5:302024-03-28T11:27:14+5:30

बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम

'Kayakalp' award to 16 health centers in Chhatrapati Sambhajinagar district | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या हेतूने आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर ७ आरोग्यवर्धिनी केंद्रांना (आरोग्य उपकेंद्र) हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम पुरस्कार पटकावला आहे. सन २०२२-२३ वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने केली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले की, सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात. तेथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत आरोग्य संस्थांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांच्या आधारावर पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यामध्ये गुणांकन करण्यात येऊन निर्धारित मानक पूर्ण करणाऱ्या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम पुरस्कार जाहीर आला असून, या पुरस्काराची रक्कम २ लाख रुपये एवढी आहे. गेल्यावर्षी हा प्रथम पुरस्कार गणोरी आरोग्य केंद्राने पटकाविला होता. यंदा गणोरी, आळंद, दौलताबाद, गदाना, सिद्धनाथ वडगाव, जातेगाव, करंजखेडा आणि वेरूळ या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले असून, त्यांंना प्रत्येकी ५० हजारांचे रोख पारितोषिक मिळाले आहे.

याशिवाय जिल्ह्यातील किनगाव आरोग्यवर्धिनी केंद्रास एक लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. जटवाडा आरोग्यवर्धिनी केंद्रास प्रथम उत्तेजनार्थ ५० हजारांचा, तर अडगाव (बु.) आरोग्यवर्धिनी केंद्रास ३५ हजारांचा द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. तसेच गल्लेबोरगाव, बिल्डा, कसाबखेडा, पिसादेवी आरोग्यवर्धिनी केंद्रांना प्रत्येकी २५ हजारांची उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली आहेत.

Web Title: 'Kayakalp' award to 16 health centers in Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.