जानुल्ला शाह मियॉ दर्गा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 07:32 PM2018-02-19T19:32:59+5:302018-02-19T19:39:33+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि भक्तीचे अनेक दाखले इतिहासात आढळून येतात. सुमारे ४०० वर्षांपूर्वी जालन्याच्या स्वारीवर असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि सुफी संत जानुल्ला शाह यांची भेट झाली. या भेटीत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडून आला.

Janullah Shah Miyan Dargah: The symbol of Chhatrapati Shivaji Maharaj's secularism | जानुल्ला शाह मियॉ दर्गा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक 

जानुल्ला शाह मियॉ दर्गा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक 

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज, सुफी संत सय्यद जान महंमद ऊर्फ जानुल्ला शाह आणि औरंगजेब यांचा काळ एकच होता.स्वारी करण्याच्या उद्देशाने आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:जवळील संपत्तीसह काही वस्तू सुफी संत जानुल्ला शाह यांना नजराणा म्हणून भेट दिल्या.स्वारी करण्याच्या उद्देशाने आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:जवळील संपत्तीसह काही वस्तू सुफी संत जानुल्ला शाह यांना नजराणा म्हणून भेट दिल्या. शिवाजी महाराजांची धर्मातीत संतश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षतेचे दाखले जालन्यातही असल्याचे इतिहासकार सांगतात.  

- राजेश भिसे 

जालना : छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि भक्तीचे अनेक दाखले इतिहासात आढळून येतात. सुमारे ४०० वर्षांपूर्वी जालन्याच्या स्वारीवर असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि सुफी संत जानुल्ला शाह यांची भेट झाली. या भेटीत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडून आला. स्वारी करण्याच्या उद्देशाने आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:जवळील संपत्तीसह काही वस्तू सुफी संत जानुल्ला शाह यांना नजराणा म्हणून भेट दिल्या. याचे उल्लेख अनेक पुस्तकांत आढळून येतात. शिवाजी महाराजांची धर्मातीत संतश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षतेचे दाखले जालन्यातही असल्याचे इतिहासकार सांगतात.  

छत्रपती शिवाजी महाराज, सुफी संत सय्यद जान महंमद ऊर्फ जानुल्ला शाह आणि औरंगजेब यांचा काळ एकच होता. जानुल्ला शाह यांनी त्याकाळी आलेम, फाजिल, मुफती, मोहद्दीस, मुफस्सीर, कातीब, हाफिज या धार्मिक क्षेत्रातील उच्च पदव्या संपादित केल्या होत्या. अरबी, फारशी, सिका, नहू, मनतिक या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ते आणि त्यांचे बंधू बाबुल्ला शाह सय्यद हे सुफी संत बु-हाणपूर येथून औरंगाबादेत आले होते. तेथे जामा मशिदीत ते वास्तव्यास असायचे. औरंगजेबचे साम्राज्य त्यावेळी दौलताबाद व परिसरात होते. याच मशिदीत जानुल्ला शाह हे सर्वांसोबत नमाज अदा करीत असत. त्यानंतर मशिदीत असलेल्या हुजरामध्ये एकांतात उर्वरित नमाज अदा करीत. जानुल्ला शाह हे सर्वांसोबत असताना अर्धवट नमाज अदा करतात, अशी तक्रार काहींनी औरंगजेबकडे केली. दुसर्‍या दिवशी औरंगजेब हे स्वत: जामा मशीदमध्ये नमाज अदा करण्यासाठी आले. ज्या खोलीत जानुल्ला शाह नमाज अदा करीत होते, त्याचा दरवाजा त्यांनी वाजवला. बर्‍याच वेळानंतरही दरवाजा उघडण्यात न आल्याने सैनिकांना सांगून तो तोडण्यात आला. तेव्हा दोन्ही सुफी संत त्या खोलीत नव्हते. सुफी संत अचानक गायब झाल्याने औरंगजेब व्यथित झाला. 

दोन्ही संतांच्या शोधात औरंगजेबचा मुलगा जालन्यापर्यंत पोहोचला. येथेच दोन्ही संतांची भेट झाल्यानंतर मुलाने सांगितले की, बादशहाने दोघांनाही  भेटण्यास बोलावले आहे. मात्र, जानुल्ला शाह यांनी ‘आम्ही फकीर आहोत, राजांची भेट आम्ही घेत नाही’, असे कळविले. निरोप मिळाल्यानंतर जामा मशिदीत केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊन औरंगजेबने जानुल्ला शाह आणि बाबुल्ला शाह सय्यद या सुफी संतांना जालन्यात ५७० बिगा जमीन दान दिली. एवढ्यावरच न थांबता जालना व परिसरातील न्याय निवाड्याकरिता अर्थात ‘काजी शरा’ म्हणून सर्व अधिकार जानुल्ला शाह यांना दिले. यातून सुफी संत असलेल्या जानुल्ला यांनी विविध धर्मांना एकत्र करण्याचे काम केले. जानुल्ला शाह यांच्या नावाने स्टॅम्प पेपरही त्यावेळी असायचे. 

जालना आणि परिसरात औरंगजेबाने कुणाला तरी जहागिरी दिली. या शहरात हिरे, सोने मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तहेरांमार्फत मिळाली. स्वराज्य विस्ताराच्या उद्देशाने जालन्यावर कूच करण्याची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. जालन्यात दाखल होण्यापूर्वी महाराज त्यांचे सुफी संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. या संतांनी सांकेतिक भाषेत कूच न करण्याचे सुचविले. मात्र, महाराजांना या संकेताचा बोध न झाल्याने सैन्यासह त्यांनी जालन्यावर कूच केली. त्यावेळी जानुल्ला शाह यांचा मुक्काम जालन्यातील शेंदीच्या वन परिसरात खानगाहमध्ये असायचा. खानगाह म्हणजे त्याकाळी तेथे शिक्षणाचे धडे दिले जात असत. शिवाजी महाराज सैन्यासह या खानगाहत पोहोचले. त्यानंतर वस्तुस्थिती त्यांनी पाहिली. सुफी संत असलेल्या जानुल्ला शाह यांचे दर्शन घेऊन ज्या पालखीत ते खानगाहात पोहोचले ती पालखी जानुल्ला शाह यांना नजराणा म्हणून भेट दिली. एवढ्यावरच न थांबता महाराजांनी सोबत हिरे, सोने, अश्रफी यासह जे जे होते, ते सर्व जानुल्ला शाह या सुफी संताला भेट दिले. नांदेडचे इतिहासकार शेलार यांनी ‘मराठवाड्याचा इतिहास’ या पुस्तकात या घटनांचा उल्लेख केलेला आढळतो. याशिवाय अनेक उर्दू पुस्तकांतही हा इतिहास मांडला गेल्याचे इतिहास अभ्यासक व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे सदस्य सय्यद जमील जानिमिया यांनी सांगितले.

या वस्तू दर्ग्यास दिल्या नजराणा...
रमजान महिन्यात एकदा आणि बकरी ईदच्या महिन्यात दुसर्‍यांदा उरुस भरतो. जानुल्ला शाह यांच्या दर्गावर वर्षातून दोनवेळा चादर चढवली जाते. कादराबाद येथील झेंडा परिसरातून ही चादर आणली जाते. यासाठी शिवाजी महाराजांनी डोली भेट दिली. अनेक वर्षे या डोलीतूनच दर्गात चादर आणली जात असे. तर नगारा, तलवार, ढाल आणि मोठा घंटा नजराणा म्हणून शिवाजी महाराजांनी दिला होता. 

बालाजी मंदिरास घंटा भेट...
शिवाजी महाजारांनी सुफी संताला ज्या भेटवस्तू दिल्या, त्यात मोठा पंचधातूचा घंटाही होता. खान खान्यात याची गरज नसल्याने तो देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरास भेट देण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट म्हणून दिलेली ऐतिहासिक तलवार आणि ढाल सध्या हैदराबाद येथील म्युझियममध्ये असल्याचे जानुल्ला शाह दर्गाचे इमाम हाफिज महमंद हनिफ, माजी सैनिक सुलतान हाजी, हाफिज वसीम खान यांनी सांगितले. खान गाहतील म्हणजेच आजचा जानुल्ला शाह मियॉ दर्ग्यात असलेला तो नगारा नामशेष झाला आहे. मूळ पालखी मोडकळीस आलेली असून, तिचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. 

Web Title: Janullah Shah Miyan Dargah: The symbol of Chhatrapati Shivaji Maharaj's secularism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.