माणिक हॉस्पिटलला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:40 AM2018-04-03T01:40:50+5:302018-04-03T15:47:36+5:30

गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून शेकडो नागरिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या ३३ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.

Horrible fire to Manik Hospital | माणिक हॉस्पिटलला भीषण आग

माणिक हॉस्पिटलला भीषण आग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून शेकडो नागरिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या ३३ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, हॉस्पिटलची लाखो रुपयांची यंत्रणा जळून खाक झाली.
गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरला सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. तेथील तळमजल्यातील इलेक्ट्रिक पॅनल गरम होऊन स्पार्किंग होऊन आग भडकली. तेथेच दुरूस्तीचे काम सुरू असल्याने काही कामगार वेल्डिंग करीत होते. आग भडकताच सर्व कामगार तेथून पळतच बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आग आग म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. आग विझविण्यासाठी तेथे असलेली अग्निशमन यंत्रे वापरण्याचा प्रयत्न केला,मात्र ती बंद असल्याने त्याचा उपयोग झाला नाही,असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिणामी अग्निशमन दलाच्या बंबाचीच प्रतिक्षा करावी लागल्याने आगीने भडका घेतला. दरम्यान हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.उल्हास कोंडापल्ले यांनी मात्र आग विझविण्यासाठी हॉस्पिटलमधील अग्निशमन यंत्रणा वापरल्याचे सांगितले. अग्निशमनची गाडी पंधरा मिनिटांत तेथे दाखल झाली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने हॉस्पिटलच्या तिस-या मजल्यापर्यंत धूरच धूर पसरला. १०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये १५ खाटांचा आयसीयू आहे. वरच्या मजल्यापर्यंत धूर गेल्याने तेथे अ‍ॅडमिट ३३ रुग्णांचा जीव कासावीस झाला. नातेवाईकांमध्ये धावपळ सुरू झाली. पोलीस कर्मचारी दीक्षित यांचे वडील येथे अ‍ॅडमिट आहेत. त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्याने धूर निघू लागला.

पोलीस, अग्निशमन दल आणि नागरिकांची मदत
हॉस्पिटलमधून धूर येत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक , जवाहरनगर पोलिसांनी मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेथील अग्निशमन यंंत्रणा ठप्प असल्याचे पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
अग्निशमनच्या काही कर्मचाºयांनी आग विझविण्याकडे तर काहींनी शिडी लावून वरच्या मजल्यावर अडकलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अवघ्या ३० मिनिटांत सर्व रुग्णांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.
आगीच्या कारणाचा, नुकसानीचा शोध सुरू -डॉ. कोंडपल्ले
या घटनेविषयी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. उल्हास कोंडपल्ले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले की, सकाळी ११ वाजता तळमजल्यावर आगीने भडका घेतला, तेव्हा तातडीची अग्निशमन यंत्रणा वापरण्यात आली. मात्र, आगीच्या धुराचे लोट वरच्या मजल्यापर्यंत गेल्याने आंतररुग्ण विभागात अ‍ॅडमिट ३३ रुग्ण तातडीने वेगवेगळ्या मार्गाने बाहेर काढून त्यांना अन्य रुग्णालयांत दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले. आग विझविण्याच्या कामात मनपा अग्निशमन विभागासह नागरिकांनी मोलाचे योगदान दिले. तळमजल्यावरील आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आल्याने जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकप्रतिनिधी व पोलीस अधिका-यांकडून पाहणी
आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार किशनचंद तनवाणी, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एसीपी डॉॅ. नागनाथ कोडे, निरीक्षक इंदलसिंग बहुरे, उपनिरीक्षक बाबासाहेब आहेर, काशीनाथ महांडुळे आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमनचे सहा बंब आणि
पाण्याचे सहा टँकर
आगीची माहिती कळताच मनपा अग्निशमन दलाचे तीन, शेंद्रा एमआयडीसीचा एक, व्हिडिओकॉन कंपनीचा एक आणि गरवारे कंपनीचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. शिवाय पाण्याच्या सहा टँकरची मदत झाली. एमजीएम आणि हेगडेवार रुग्णालयातील अग्निशमन अधिकारी आणि कर्मचायांनीही आग तेथे धाव घेतली.

Web Title: Horrible fire to Manik Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.