नदीपात्रातील वाळूपट्टे झाले सामसूम

By Admin | Published: June 30, 2014 12:34 AM2014-06-30T00:34:17+5:302014-06-30T00:40:13+5:30

भोकरदन/केदारखेडा : तालुक्यात महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाळूच्या अवैध उपशाप्रकरणी स्टिंग आॅपरेशनद्वारे केलेल्या कारवाईत ५ कोटींची वाळू व ३ कोटींची वाहने जप्त केली.

Draupum in the river bed | नदीपात्रातील वाळूपट्टे झाले सामसूम

नदीपात्रातील वाळूपट्टे झाले सामसूम

googlenewsNext

भोकरदन/केदारखेडा : तालुक्यात शनिवारी महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाळूच्या अवैध उपशाप्रकरणी गव्हाण संगमेश्वर आणि पूर्णा नदीपात्रात स्टिंग आॅपरेशनद्वारे केलेल्या कारवाईत ५ कोटींची वाळू व ३ कोटींची वाहने जप्त केली. भोकरदन पोलिस ठाण्यात ४३ ट्रकचालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून रविवारी दुसऱ्या दिवशी नदीपात्र परिसरात सामसूम होती.
उपविभागीय अधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रुपा चित्रक, जाफराबादचे तहसीलदार संदीप ढाकणे, नायब तहसीलदार आर.जे. डोळे यांच्यासह २० कर्मचारी तसेच भोकरदन व टेंभूर्णी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी वाळूपट्ट्यांवर छापे मारले होते.
गव्हाण संगमेश्वर हे गाव भोकरदन तालुक्यात येत असले तरी ते जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे गुन्हा भोकरदन पोलिस ठाण्यात दाखल करायचा की, टेंभुणी पोलिस ठाण्यात याविषयी शनिवारी रात्री अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. जवखेडा ठोंबरी व केदारखेडा हे भोकरदन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे शेवटी भोकरदन पोलिस ठाण्यात ४३ वाहनांच्या चालक व मालकांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र काही वाहनांच्या मालकांमध्ये अनेक मातब्बरांचा समावेश असण्याची शक्यता असल्याने त्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहनांच्या क्रमांकावरून पोलिसांना वाहन मालकाचा शोध घ्यावा लागणार आहे.
वाळूचा अवैध उपसा करण्यासाठी जी वाहने वापरण्यात आली, त्यामध्ये फार कमी वाहने जालना आरटीओ पासिंगची आहेत. बऱ्याच वाहनांवरील क्रमांक बनावट असण्याची शक्यता आहे. तर त्यातील काही वाहने बाहेरच्या पासिंगची आहेत. त्यामुळे पोलिसांना जालना, औरंगाबाद, धूळे, अहमदनगर, मुंबई, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये शोध घ्यावा लागणार आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके स्थापन करण्यात येणार असून वाहनांवर बनावट क्रमांक आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली. ज्या २२ वाहनांचे चालक-मालक वाहनासह पसार झाले, त्यांचाही शोध घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)
वाळूमाफियांचे
धाबे दणाणले
महसूल प्रशासनाकडून वाळूचा अवैध उपसा केल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक कारवाया झाल्या. मात्र त्या थातूरमातूर होत्या. शनिवारी महसूल व पोलिस पथकाने केलेल्या कारवाईमुळे नेहमी गजबजणारे पूर्णा नदीच्या पात्रात रविवारी सामसूम होता. अन्यथा या भागात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते.
केदारखेड्यासह मेरखेडा, बामखेडा, जवखेडा ठोंबरे, वालसा खालसा, वालसा डावरगाव, बोरगाव तारू, देऊळगाव ताड, नळणी आदी गावाच्या भागातील गिरजा, पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केला जातो. आठ दिवसांपूर्वीच केदारखेडा, वालसा या दोन वाळूपट्ट्यांची व वाळूचे साठे करणाऱ्यांविरुद्ध स्वत: उपविभागीय अधिकारी डॉ. शेळके यांनी कारवाई केली होती.

Web Title: Draupum in the river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.