वीरपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:45 AM2018-04-14T00:45:05+5:302018-04-14T00:50:46+5:30

अनंताच्या प्रवासाला निघालेले शहीद जवान किरण थोरात यांचे पार्थिव बघून फकिराबादवाडीत अश्रूंचा बांध फुटला. दोन दिवसांपासून शोकसागरात बुडालेल्या ग्रामस्थांनी या वीर सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या सलामीबरोबर हजारोंच्या समुदायाने ‘किरण भाऊ अमर रहे’ची घोषणा देताच फकिराबादवाडी गहिवरून गेली.

Dear son! | वीरपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप!

वीरपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप!

googlenewsNext
ठळक मुद्देफकिराबादवाडी गहिवरली : किरण थोरात यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

भागवत हिरेकर/ दीपक ढोले
फकिराबादवाडी (जि. औरंगाबाद): अनंताच्या प्रवासाला निघालेले शहीद जवान किरण थोरात यांचे पार्थिव बघून फकिराबादवाडीत अश्रूंचा बांध फुटला. दोन दिवसांपासून शोकसागरात बुडालेल्या ग्रामस्थांनी या वीर सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद जवान किरण थोरात यांच्या पार्थिवावर मूळगावी फकिराबादवाडी येथे (ता. वैजापूर) शुक्रवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या सलामीबरोबर हजारोंच्या समुदायाने ‘किरण भाऊ अमर रहे’ची घोषणा देताच फकिराबादवाडी गहिवरून गेली.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने बुधवारी केलेल्या गोळीबारात फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपटराव थोरात धारातीर्थी पडले. हे वृत्त धडकताच फकिराबादवाडी शोकसागरात बुडाली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता औरंगाबाद येथून शहीद किरण थोरात यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. वीरमरण आलेल्या जवानाला अखेरचा सलाम करण्यासाठी जिल्ह्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. गावात पार्थिव दाखल होताच, पाकिस्तान मुर्दाबाद, ‘अमर रहे, अमर रहे, किरण भाऊ अमर रहे’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ या घोषणा गगनाला भिडल्या. फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून शहीद जवान किरण थोरात यांची म्हसोबा चौक ते त्यांचे घर अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर उपस्थितांनी शहीद किरण थोरात यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांचे बंधू अमोल थोरात यांनी मुखाग्नी देताच लष्कराने हवेत फैरी झाडून अखेरची सलामी दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, तहसीलदार सुमन मोरे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या जनसमुदायातून ‘किरण भाऊ अमर रहे’ची घोषणा आसमंतात दुमदुमली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी नागरिकांनी परतीचा रस्ता धरला.


...अन् त्या माऊलीने हंबरडा फोडला
किरण थोरात शहीद झाल्याची बातमी बुधवारी त्यांच्या घरी धडकली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे पार्थिव गावात आले. अंत्ययात्रेनंतर किरण यांचे पार्थिव घरात नेण्यात आले. पार्थिव दारात येताच त्या माऊलीने हंबरडा फोडला आणि उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. काळजाच्या तुकड्यासाठी धायमोकलून रडणाऱ्या आईला बघून सांत्वन करणाºयांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

पहाटेपासून फकिराबादवाडीकडे रीघ
गुरुवारी सायंकाळी शहीद किरण थोरात यांचे पार्थिव औरंगाबादेत आणण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याने पंचक्रोशीतून पहाट उजाडताच फकिराबादवाडीकडे रीघ लागली होती. रस्त्यासह शेतातील पाऊलवाटाही गर्दीने ओसंडून गेल्या होत्या.

सडा, रांगोळी आणि सुन्न मने
शहीद जवान किरण थोरात यांची अंत्ययात्रा काढण्यात आलेल्या मार्गावर सडा आणि रांगोळी काढण्यात आली होती. देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान आणि आता कधीच दिसणार नाही याचे दु:ख, अशा मन सुन्न करणाºया घटनेने ग्रामस्थ सकाळपासून पार्थिव येणाºया रस्त्याकडे चातकासारखे डोळे लावून बसले होते. पार्थिव येताच रस्त्याच्या कडेला बसलेल्या महिलांनी डोळ्याला पदर लावला.

तिने पदराने सावली केली
किरण यांची अंत्ययात्रा अकरा वाजता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचली. ऊन्हाचा पारा चांगलाच वाढला होता; पण अंगाला झोंबणाºया झळांमध्येही अखेरची मानवंदना देण्यासाठी आलेला जनसमुदाय स्तब्ध होता. किरण यांच्या पार्थिवाजवळ असलेल्या आई कांताबार्इंना उन्हाची जाणीव होताच पदराने त्यांनी शहीद किरण यांच्या चेहºयावर सावली केली. हे दृश्य बघून उपस्थितांना शब्दही फुटेनासे झाले.

पिकांनीही वाट करून दिली
किरण यांचे घर शेतवस्तीवर, त्यामुळे शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या समुदायाला जाण्यासाठी रस्ताही कमी पडायला लागल्यावर नागरिकांनी पिकातूनच वाट काढली. त्यामुळे पिके आडवी पडली. सर्वजण परतताना जणू या पिकांनीही माणसांना वाट करून दिली होती, असाच भास होत होता.

किरणला आधुनिक शेती करायची होती
किरण थोरात लष्करात गेले; पण निवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने शेती करायची, असे त्यांनी आधीच ठरवून ठेवले होते. शेतीत जीव असलेल्या किरण यांनी काही महिन्यांपूर्वीच शेतीही विकत घेतली; पण नियतीला ते पाहवलेच नाही... आश्रूंना आवरत मावसभाऊ गणेश सत्रे सांगत होता.

शहिदांच्या पत्नींनी काय करायचे?
अंत्यसंस्कारानंतर गर्दी आल्या वाटेने निघत असतानाच, ‘आज जे लोक जमा झाले त्यातील किती लोक पुन्हा चार महिन्यांच्या लेकराला भेटण्यासाठी येतील?’ असा परखड सवाल सगळ्यांच्या कानावर आदळला आणि सगळेच परत फिरले. तो सवाल केला होता कमल खरात यांनी. शहीदपत्नी असलेल्या खरात औरंगाबादच्या. त्या बचत गट चालवतात. त्या म्हणाल्या, आज हे राजकीय नेते, अधिकारी फक्त अभिवादनासाठी येतात. वर्षभरानंतर शहिदाच्या पत्नीकडे कुणी येऊन फिरकणार नाही. वर्षभरानंतर किती लोक येतील, शहिदाच्या घरी भेटायला? या त्यांच्या प्रश्नावर सगळेच निरुत्तर झाले. जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे होणारे हाल त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. यात त्यांनी स्वत:चा कटू अनुभवही सांगितला.

चिमुकल्यालाही कळल असेल का?
किरण थोरात यांना दोन मुले. दोन वर्षांची मुलगी आणि पाच महिन्यांचा मुलगा. त्यांचे पार्थिव घराकडे येत असताना या चिमुकल्यांचे रडणे सुरू झाले. माणसांची शुद्ध हरपली होती; पण इवलुशा चिमुकल्यांना काही कळत असेल का, याचे उत्तर गर्दीतील लोक शोधत होते, तर अंत्यसंस्कारापूर्वी पाच महिन्यांच्या श्लोकला आईने किरण यांच्या पार्थिवाजवळ आणले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

जवानांचे शहीद होणे केव्हा थांबणार?
जळीत सवाल करीत औरंगाबादच्या तरुणाची सायकलवारी

किरण थोरात यांच्या अंत्यसंस्काराला आलेल्या गर्दीत एक सायकल होती. सायकलीवर असलेल्या मोठ्या बोर्डवर एक जळजळीत प्रश्न केलेला होता. ‘सलाम वीर जवान किरण थोरात. जवानांचं शहीद होेणं केव्हा थांबणार...?’ हा सवाल केला होता, औरंगाबादेतील सुधीर काकडे या तरुणाने. किरण थोरात यांना अभिवादन करण्यासाठी तो औरंगाबाद ते फकिराबाद, असा सायकल वारी करीत आला होता.

हजारोंचा जनसमुदाय
माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, आ. सुभाष झांबड, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, मनसुख झांबड, माजी आमदार आर.एम. वाणी, डॉ. कल्याण काळे, भागवत कराड, एकनाथ जाधव, मोहन आहेर, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, साबेरखान, जि. प. सदस्य प्रा. रमेश बोरनारे, पंकज ठोंबरे, अविनाश गलांडे, सराला बेटाचे महंत ह.भ.प. रामगिरी महाराज, प्रशांत सदाफळ, ज्ञानेश्वर टेके, प्रा. जवाहर कोठारी, धोंडिरामसिंह राजपूत, फकिराबादवाडी व लाडगावचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

Web Title: Dear son!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.