लातुरात लवकरच अतिरिक्त एमआयडीसी- २ ची उभारणी: उदय सामंत

By हरी मोकाशे | Published: October 13, 2023 07:29 PM2023-10-13T19:29:56+5:302023-10-13T19:30:37+5:30

उदगीरच्या एमआयडीसीला तत्वत: मंजुरी

Construction of additional MIDC-2 soon in Latur: Udaya Samant | लातुरात लवकरच अतिरिक्त एमआयडीसी- २ ची उभारणी: उदय सामंत

लातुरात लवकरच अतिरिक्त एमआयडीसी- २ ची उभारणी: उदय सामंत

लातूर : नवनवीन उद्याेग उभारणीबरोबरच हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी लातुरात लवकरच अतिरिक्त एमआयडीसी- २ ची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ४८२ हेक्टर जागेची आवश्यकता असून शेतकऱ्यांना सोबत घेऊन भूसंपादन करावे, अशा सूचना केल्या असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार पत्रपरिषदेत दिली. शिवाय, उदगीरातही एमआयडीसी उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, अनिल भंडारी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जि.प.चे सीईओ अनमोल सागर आदींची उपस्थिती होती. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, चाकुरात २६६ हेक्टरवरील एमआयडीसी प्रक्रिया सुरु असून जळकोटात मिनी एमआयडीसी उभारण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. लातूर, औसा, अहमदपूर येथील ४३ कोटींची सात कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच निविदा निघून कामे सुरु होतील.

जलवाहिनीसाठी निधी देण्याचा निर्णय...
एमआयडीसीला पाणीपुरवठ्यासाठी ३६ एमएलडीची जलवाहिनी असली तरी प्रत्यक्षात ५ एमएलडी पाणी मिळते. ही जलवाहिनी जुनी जीर्ण झाल्याने त्यासाठी आणि विद्युतसाठी एमआयडीसीतून निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिनाभरात त्याची अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ३५० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.

बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा...
केंद्र शासनाच्या वतीने बारा बलुतेदार आणि १८ घटकांसाठी विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यास ५०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. योजनेतून प्रशिक्षण, आधुनिक यंत्रे देण्यात येणार आहेत. कदाचित त्याची सुरुवात लातूरपासून सुरु होईल, असेही सामंत म्हणाले.

विमानतळासाठी ३८ हेक्टर जमीन संपादित...
लातूरच्या विमानतळासाठी ४८ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून सध्या ३८ हेक्टर जमीन एमआयडीसीने ताब्यात घेतली आहे. आणखीन १० हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करुन ती घेण्यात येईल. हे विमानतळ खाजगी कंपनीस देण्यात आले होते. ते एमआयडीसी आणि विमान प्राधिकरणकडे देण्यासाठी आपला प्रयत्न सुरु आहे. अगदी विमान पार्किंगमधूनही कोट्यवधीचे उत्पन्न होईल.

संजय बनसोडे सल्लागार पालकमंत्री...
आमचे हे सरकार तीन पक्षांचे आहे. त्यामुळे काही राजकीय तडजोड करावी लागते. मी रत्नागिरीतून निवडून येऊनही सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो. तसेच सध्याचेही लातूरचे आहे. लातूरचे पालकमंत्री हे मंत्री संजय बनसोडे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेत असतात. त्यामुळे ते सल्लागार पालकमंत्री आहेत, असेही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

Web Title: Construction of additional MIDC-2 soon in Latur: Udaya Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.