पीएचडीच्या मौखिक परीक्षेच्या जेवणावळी बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:11 PM2019-05-08T12:11:51+5:302019-05-08T12:14:34+5:30

कुलगुरूंच्या आदेशानंतर पीएच.डी. विभागाने काढले परिपत्रक

Close the party system after PhD's oral examination | पीएचडीच्या मौखिक परीक्षेच्या जेवणावळी बंद करा

पीएचडीच्या मौखिक परीक्षेच्या जेवणावळी बंद करा

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात होणाऱ्या पीएच.डी. मौखिक चाचणीनंतर संशोधक विद्यार्थ्यांना जेवणावळी द्याव्या लागतात. या जेवणावळी तात्काळ बंद करण्यात याव्यात, असे परिपत्रक पीएच.डी. विभागाने काढले आहे.  

मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंटस् (मास) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेत पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेनंतर होणाऱ्या जेवणावळीकडे लक्ष वेधले. संशोधकांचा व्हायवा मोठा सोहळा असतो. मौखिक चाचणीचे परीक्षक, मार्गदर्शक आणि विभागप्रमुख यांच्या भोजनाची जबाबदारी संशोधकाला उचलावी लागते. यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतात. परीक्षक विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये न राहता महागड्या हॉटेलात राहतात. यामुळे संशोधक विद्यार्थ्याला ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च सोसावा लागतो. मौखिक चाचणी ही परीक्षाच असल्यामुळे तेथे हे प्रकार कसे घडतात, असा सवाल करीत मास संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी कुलगुरूंसमोर तक्रारीचा पाढाच वाचला.

विद्यापीठाच्या कामकाजातील त्रुटी दूर करा, पीएच.डी. विभागात तात्काळ अतिरिक्त कर्मचारी नेमा, वसतिगृह आणि अभ्यासिकेत सुरळीत पाणीपुरवठा करा, गाईडशिपची यादी अपडेट करणारी यंत्रणा विकसित करा, संशोधन विभागातील काम किती दिवसांत होईल, याची माहिती देणारे बोर्ड लावा, अशी मागणीही करण्यात आली. 
सध्या पीएच.डी. विभागात एकही काम तात्काळ होत नाही. व्हायवा झाल्यानंतर तात्काळ नोटिफिकेशन मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना शिष्टमंडळाने केली. त्यावर सकाळच्या सत्रात व्हायवा आणि सायंकाळपर्यंत नोटिफिकेशन देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. शिष्टमंडळात सचिन बोराडे, अमित कुटे, प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, दिगंबर जाधव, अजय पवार, आदित्य मुठ्ठे, विजय चिंचाणे यांचा समावेश होता. सूचनांची दखल घेत कुलगुरूंनी तात्काळ पीएच.डी. विभागात पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली, तसेच जेवणावळी, हार, पुष्पगुच्छ देणे-घेणे येऊ बंद करावे, असे परिपत्रक काढले.

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे?
विद्यापीठ यंत्रणेने कामकाज सुरळीत केल्यास विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही; पण काम सुरळीत होत नाही. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न डॉ. उढाण यांनी केला. कोणतेही काम निर्धारित वेळेत आणि पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही, असे त्यांनी डॉ. चोपडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

Web Title: Close the party system after PhD's oral examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.