थेट लढतीसाठी आटापीटा..!

By Admin | Published: February 6, 2017 11:11 PM2017-02-06T23:11:08+5:302017-02-06T23:11:58+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत

Autapeta for direct fight ..! | थेट लढतीसाठी आटापीटा..!

थेट लढतीसाठी आटापीटा..!

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी चौरंगी-पंचरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. या पार्श्वभूमीवर मतविभाजन टाळून थेट लढती घडविण्यासाठी प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होता. या प्रयत्नांना कितपत यश आले, याचे उत्तर मात्र मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १६५ जागांसाठी तब्बल १ हजार ८०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची त्या-त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात छाननी झाल्यानंतर गटाचे १६ आणि गणाचे ३० अर्ज बाद झाले होते. त्यानंतरही बहुतांश ठिकाणी उमेदवारी अर्ज अधिक राहिल्याने पक्षनेत्यांसह उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसांपासून मतविभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नाराजांची मनधरणी सुरू होती. पक्षातील बंडखोरांना थोपविताना समविचारी पक्षाच्या इतर उमेदवारांनाचीही समजूत घालण्याचा प्रयत्न सर्वच पातळ्यांवर सुरू होता. या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.
तुळजापूर, उस्मानाबाद, कळंबमध्ये चौरंगी लढती झाल्यास त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला होवू शकतो, हे लक्षात घेऊन शक्य त्या ठिकाणी शिवसेना-काँग्रेसमध्ये छुपी युती करण्यासाठी काही नेते आग्रही होते. या अनुषंगाने उशिरापर्यंत बैठकही झाली. मात्र, त्यातील तपशील बाहेर आलेला नव्हता. असाच प्रकार उमरगा-लोहाऱ्यातही सुरू होता. तेथे काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर छुप्या युतीसाठी काही उमेदवारांसह नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, तेथेही उशिरापर्यंत ठोस तोडगा निघालेला नव्हता. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांसह तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. यामध्ये तेर मतदारसंघातून आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी, विद्यमान सदस्या अर्चनाताई पाटील निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पूत्र किरण गायकवाड हे उमरगा तालुक्यातील कुन्हाळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तेथे भाजपा-काँग्रेसशी त्यांची चुरशीची लढत होणार आहे. आ. मधुकरराव चव्हाण यांचे पूत्र बाबूराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथे राष्ट्रवादी, भाजपासोबतच शिवसेना उमेदवारही रिंगणात आहे. तर उमरगा तालुक्यातील आलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आ. बसवराज पाटील यांचे पूत्र शरण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तेथे शिवसेना-भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी थेट लढत होत आहे. परंडा तालुक्यात लोणी गणातून माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांचे पूत्र रणजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याबरोबरच इतरही काही मतदारसंघातील लढती दिग्गज मैदानात उतरल्याने प्रतिष्ठेच्या होत आहेत. या ठिकाणी एकास-एक लढती व्हाव्यात, यासाठी नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू होते. तर काही मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच इच्छुक असलेल्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने त्या ठिकाणी नेमके कोण मैदानात राहते, याबाबतही रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आता मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Autapeta for direct fight ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.