आवंढे, दाटलेले कंठ अन् धीरगंभीर सभागृह

By Admin | Published: June 8, 2014 01:11 AM2014-06-08T01:11:45+5:302014-06-08T01:15:30+5:30

औरंगाबाद : ‘सुन्न आम्ही, क्षुब्ध आम्ही, स्तब्ध आम्ही, फक्त प्रेरणा तुम्ही...’ अशीच काहीशी भावना त्या धीरगंभीर सभागृहाची झाली होती

Around the corner, the thick and the throat | आवंढे, दाटलेले कंठ अन् धीरगंभीर सभागृह

आवंढे, दाटलेले कंठ अन् धीरगंभीर सभागृह

googlenewsNext

औरंगाबाद : ‘सुन्न आम्ही, क्षुब्ध आम्ही, स्तब्ध आम्ही, फक्त प्रेरणा तुम्ही...’
अशीच काहीशी भावना त्या धीरगंभीर सभागृहाची झाली होती. आवंढे गिळत वक्ता एखादी आठवण सांगत होता. स्तब्ध व तेवढ्याच धीरगंभीर सभागृहातून उसासे बाहेर पडत होते. कुणाचा कंठ दाटून येत होता, तर गहिवरल्या मनाने कुणी ओघळणारे अश्रू रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. तरीही साहेबांचे मोठेपण, कर्तेपण, जाणतेपण सांगत होते. तब्बल तीन तास सभागृह निश्चल होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यधुरंधरतेच्या आठवणीत प्रत्येक जण लीन झाला होता.
केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना शनिवारी सायंकाळी सिडको नाट्यमंदिरात सर्वपक्षीय, सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजकांसह शहरवासीयांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला आल्या होत्या. मंचावर गोपीनाथ मुंडे यांची हसरी तसबीर पाहून अनेकांचा ऊर दाटून येत होता.
गॉडफादर गेले
ते माझे कधी मोठे भाऊ होते, तर कधी मला बेटा म्हणत. शिवसेना पक्षाबाहेरील ते माझे गॉडफादर होते, आधारस्तंभ होते, अशी भावुक श्रद्धांजली खा. चंद्रकांत खैरे यांनी अर्पण केली.
औरंगाबादेत भव्य स्मारक उभारा
मराठवाड्याची अहोरात्र सेवा करणारे, मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी झटणारे गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक उभे करावे. त्यातूनच आम्हाला सतत प्रेरणा मिळत जाईल, अशी सूचना खा. राजकुमार धूत यांनी श्रद्धांजली वाहताना केली.
महापौर कला ओझा, उद्योगपती राम भोगले, आ. दिवाकर रावते, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, आ. पाशा पटेल, आ. डॉ. कल्याण काळे, आ. संजय शिरसाट, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, बाबूराव कदम, अनिल भालेराव, बारगजे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, माजी आ. विनायक मेटे, अ‍ॅड. सतीश तळेकर, सुभाष पाटील, डॉ. पी.एम. दरक, सुभाष लोमटे, मौलाना हाफीज, मधुकरअण्णा मुळे, माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर, ह.भ.प. नवनाथ आंधळे महाराज, शिरीष बोराळकर, उल्हास उढाण, विवेक देशपांडे आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महावीर पाटणी यांनी प्रास्ताविक केले. माजी आ. श्रीकांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. आ. प्रदीप जैस्वाल, आ. सतीश चव्हाण, माजी खा. मोरेश्वर सावे, संजय जोशी, ज्ञानोबा मुंढे, संजय केणेकर, राजू शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.
सीआयडी चौकशी व पंकजा
कृपया भाजपाच्या नेत्यांवर संशय घेऊ नका, असे आवाहन खा. खैरे यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त करताच, आतापर्यंत अडीच तास शांत, शोकाकुल असलेल्या सभागृहातून ‘सीआयडी चौकशी झालीच पाहिजे’च्या जोरदार घोषणा दणाणल्या.
मनोगत संपता संपता खैरे यांनी ‘आता पक्षाने पंकजाला सांभाळावे’ असे आवाहन करताच, उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीस श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच, पुन्हा सीआयडी चौकशीची मागणी झाली व पंकजाचे काय करणार, असेही त्यांना विचारण्यात आले.

Web Title: Around the corner, the thick and the throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.