औरंगाबादमध्ये ‘समांतर’ कंपनीच्या विरोधात कृती समिती उभारणार लोकलढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:53 PM2018-04-10T12:53:30+5:302018-04-10T12:54:25+5:30

कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने केला.

Action Committee will be set up in Aurangabad against Parallel Company | औरंगाबादमध्ये ‘समांतर’ कंपनीच्या विरोधात कृती समिती उभारणार लोकलढा

औरंगाबादमध्ये ‘समांतर’ कंपनीच्या विरोधात कृती समिती उभारणार लोकलढा

googlenewsNext

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेने जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे काम करावे. कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने आज केला.

स.भु. शिक्षण संस्थेच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी समांतर जलवाहिनी कृती समितीची बैठक प्रा. विजय दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, अण्णा खंदारे, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, सुभाष लोमटे, रमेशभाई खंडागळे, ओम प्रकाश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. दिवाण यांनी समांतर जलवाहिनी कंपनीचा मूळ करार, कंपनीकडून वेळोवेळी झालेल्या अनियमितता आदींवर प्रकाश टाकला. दरवर्षी औरंगाबादकरांवर दहा टक्के पाणीपट्टी वाढीचा बोजा कशापद्धतीने टाकण्यात येत होता. ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाणीपुरवठा योजना मनपाने चालविली पाहिजे. कंपनीकडे जेव्हा पाणीपुरवठा होतो तेव्हा तो पूर्णपणे विस्कळीत झाला होता, अशा परिस्थितीतही मनपाने कंपनीला १४ महिन्यांमध्ये तब्बल २०० कोटी रुपये अदा केले. 

२०११ मध्ये कंपनीसोबत करार होतो, २०१६ मध्ये तो रद्द करण्यात आला. एवढी वर्षे मनपा झोपली होती का...? शहरातील १५ लाख नागरिकांनी वेठीस धरण्याचा हा प्रकार होता. कंपनीसोबत अनेकांचे लागेबांधे होते, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व परिस्थितीच्या विरोधात आम्ही न्यायालयापर्यंत लढा उभा केला. तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर, ओम प्रकाश बकोरिया यांनी नागरी हित डोळ्यासमोर ठेवून कंपनीच्या हकालपट्टीसाठी ठोस भूमिका घेतली. त्यामुळे मनपाच्या सभागृहात कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता परत एकदा कंपनीला शहरात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध केला तर माझ्या घरावर मोर्चे आणण्याची भाषा करण्यात येत आहे. खा. चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता त्यांनी हा तपशील नमूद करीत मी त्यांच्या घरावर मोर्चे नेईन, असेही दिवाण यांनी सांगितले. एमआयडीसी ९ रुपये दराने पाणी देते. मनपा ४५ रुपये दराने पाणी देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शहरात फक्त पाणी आणावे
डॉ. भालचंद्र कांगो यांनी नमूद केले की, मनपाने एक कंत्राटदार नेमावा. जायकवाडीहून शहरात पाणी आणावे. पाणीपुरवठा मनपाकडेच ठेवावा. शहरातील १५५ गुंठेवारी वसाहतींना आजही पाणी मिळत नाही. शहरातील ७० टक्के जनतेला पाणी हा प्रश्नच वाटत नाही. यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: Action Committee will be set up in Aurangabad against Parallel Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.