अभियंता वळला दहशतवादाकडे; 'एनआयए'ची पाळत, छत्रपती संभाजीनगरातून तरुण ताब्यात

By सुमित डोळे | Published: February 16, 2024 06:21 PM2024-02-16T18:21:49+5:302024-02-16T18:25:01+5:30

इसिसचे ध्येय पूर्ण करण्याची घेतली शपथ, महिनाभरापासून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न, पोलिसांनी अर्ज प्रलंबित ठेवल्याने मोठी घटना टळली

A young engineer leaves a high-paying job in Bangalore and turns to terrorism; A major incident was avoided by keeping the passport verification pending | अभियंता वळला दहशतवादाकडे; 'एनआयए'ची पाळत, छत्रपती संभाजीनगरातून तरुण ताब्यात

अभियंता वळला दहशतवादाकडे; 'एनआयए'ची पाळत, छत्रपती संभाजीनगरातून तरुण ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : गेली दोन ते अडीच वर्षांपासून शहरातील तरुणांचा एक गट आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता. हर्सूलच्या बेरीबाग परिसरात गल्ली क्रमांक ४ मध्ये राहणारा मोहम्मद झोहेब खान (४०) हा त्यांचे नेतृत्व करत होता. अधिकाधिक स्थानिक तरुणांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी इसिसच्या आंतरराष्ट्रीय हस्तकांकडून त्याला मार्गदर्शन सुरू होते. वेब डेव्हलपर असलेल्या झोहेबने कोरोनाकाळात बंगळुरूमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून घरी परतला. त्यानंतर त्याने कुठलीही नोकरी केली नाही. कुटुंबाला मात्र वर्क फ्रॉम होमची कामे करत असल्याचे तो सातत्याने सांगत होता, अशी माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे.

एनआयएच्या पथकाने गुरुवारी शहरात ९ ठिकाणी छापे टाकले. त्यात झोहेबला अटक करत त्याच्या संपर्कात असलेल्या तरुणांची कसून चौकशी सुरू होती. परिसरात राहणारा तरुण आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे कळल्यानंतर बेरीबाग परिसराला मोठा धक्का बसला. गुरुवारी सकाळीच पथकाने त्याला घरातून ताब्यात घेतले. त्याच्या खोलीतून लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे व इसिसच्या कट्टरवादाशी संबंधित अनेक पुस्तके आढळून आली. सोशल मीडियासह झोहेब प्रत्यक्ष तरुणांना भेटून इसिसमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करत होता. हिंसक व्हिडीओ दाखवून विद्रोही विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी उद्युक्त करत होता.

सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा दहशतवादाकडे
झोहेबचे सर्व कुटुंब उच्चशिक्षित आहे. झोहेब २०२० पर्यंत बंगळुरूमध्ये वेब डेव्हलपर होता. त्याला अनुक्रमे ९ व ३ वर्षांची दोन मुले व ६ वर्षांची मुलगी आहे. झोहेबची पत्नी मुलांसह माहेरी राहते. बेरीबागमध्ये तो वृद्ध वडील, आई, बहीण व तिच्या मुलांसह राहतो. कोरोनाकाळात नोकरी सोडल्यानंतर झोहेब घरी परतला. त्याच दरम्यान तो इसिसच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. झोहेबचे ८१ वर्षांचे वडील सेवानिवृत्त कृषी अधीक्षक असून बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी नोकरी केली आहे. त्यांचीही आता प्रकृती खालावलेली असते.

दोन्ही भाऊ, जावई विदेशात
झोहेबच्या दोन भावांपैकी एक भाऊ ओमानमधील मस्कट शहरात प्राध्यापक आहे. दुसरा भाऊ उत्तर आफ्रिकेतील लिबियामध्ये अभियंता आहे. त्यांचा एक जावई दुबईत नोकरी करतो. झोहेबचे स्थानिक घरही अत्यंत साधे, रंग न दिलेले आहे. घरात फारशा वस्तूदेखील नाहीत. झोहेब चोवीस तासांपैकी अर्धाअधिक काळ बेडरूमध्येच थांबत होता. परिसरात देखील त्याने कधीच कोणाशी संवाद साधला नाही. झोहेबचे कुटुंबातील सदस्य आम्हाला कित्येक दिवस बाहेर दिसत नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

पासपोर्टसाठी अर्ज
दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या झोहेबने काही दिवसांपूर्वीच पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट विभागाकडून त्याच्या व्हेरिफिकेशनच्या प्रस्तावाचा ई-मेल देखील पाठवला होता. त्यासाठी झोहेबने दोन-तीन वेळेस हर्सूल पोलिस ठाण्यात चकरा मारल्या. मात्र, पोलिसांनी तो प्रलंबित ठेवला होता. विदेशात जाण्यासाठीच तो पासपोर्टच्या प्रयत्नात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पोलिसांनी व्हेरिफिकेशनच प्रलंबित ठेवल्याने मात्र मोठी घटना टळली.

Web Title: A young engineer leaves a high-paying job in Bangalore and turns to terrorism; A major incident was avoided by keeping the passport verification pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.