प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र

By बापू सोळुंके | Published: March 14, 2024 06:01 PM2024-03-14T18:01:08+5:302024-03-14T18:01:13+5:30

तालुकास्तरीय बैठकांमध्ये उमेदवारी दाखल करण्याचे ठराव

A session of meetings of the Maratha community to nominate at least two candidates for the Lok Sabha from each village | प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र

प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत टिकणारे आरक्षण द्यावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात लावण्यात आलेली एसआयटी रद्द करावी, या मागणीसाठी मराठा समाजाने आता आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यकर्त्यांची कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावांतून किमान दोन उमेदवार देण्याचा ठराव तालुकास्तरीय बैठकांमध्ये घेतला जात आहे. शासनाने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी आरक्षण दिले. जरांगे यांनी हे आरक्षण अमान्य करीत सगेसोयऱ्याचा कायदा करावा आणि ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, ही मागणी लावून धरली आहे. यानंतर राज्य सरकारने जरांगे यांच्याविरोधात एसआयटीची स्थापना केली. यादरम्यान मराठा आरक्षणाविरोधात पुन्हा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवाय न्यायालयानेही या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून एसईबीसी आरक्षणाची पदभरतीचा लाभ आणि इतर सवलती असतील, असे स्पष्ट केले. 

यामुळे मराठा समाजाने आता राज्यकर्त्यांना थेट लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, गंगापूर या तालुक्यांतील मराठा समाजाच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मागील आठवड्यात गंगापूर येथे ५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यातून किमान दोन जणांनी उमेदवारी दाखल करावी, असा ठराव घेण्यात आला. गंगापूर तालुक्यात २२४ गावे आहेत. दोन दिवसांपूर्वी वैजापूर येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातून १६५ गावांतून तब्बल ६६० मराठा बांधव उमेदवारी दाखल करणार आहेत. कन्नड तालुक्यातील मराठा समाजाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत १३८ गावांतून प्रत्येकी दोन उमेदवार मराठा समाज देणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठा समाजातील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला.

किमान १०० जण उमेदवारी दाखल करतील
लहान गावातून एक, दोन तर मोठ्या गावांतून चार ते पाच जणांनी उमेदवारी दाखल करण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकांमध्ये घेतला जात आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याविषयीची माहिती व्हॉट्सअपद्वारे पुरविली जात आहे. शिवाय मराठा उमेदवारांची यादीही सकल मराठा समाज गोळा करीत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही किमान १०० जण उमेदवारी दाखल करतील.
-प्रा. चंद्रकांत भराट, संयोजक, सकल मराठा समाज.

Web Title: A session of meetings of the Maratha community to nominate at least two candidates for the Lok Sabha from each village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.