घाटीत २२ हजार सदोष इंजेक्शनचा झाला वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:37 PM2018-11-29T23:37:26+5:302018-11-29T23:39:42+5:30

घाटी रुग्णालयात काळपट आणि बुरशीसदृश दोष आढळून आलेल्या २२ हजार इंजेक्शनचा रुग्णांना वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरवठा झालेल्या ८० हजारपैकी केवळ ५८ हजार इंजेक्शनचा साठा गोठवण्यात आला आहे. दोष आढळून येण्यापूर्वीच रुग्णांना इंजेक्शन दिले गेले.

 22,000 defective injections were used in the valley | घाटीत २२ हजार सदोष इंजेक्शनचा झाला वापर

घाटीत २२ हजार सदोष इंजेक्शनचा झाला वापर

googlenewsNext
ठळक मुद्दे धक्कादायक : ८० हजार पैकी केवळ ५८ हजार इंजेक्शनचा साठा गोठवला

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात काळपट आणि बुरशीसदृश दोष आढळून आलेल्या २२ हजार इंजेक्शनचा रुग्णांना वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरवठा झालेल्या ८० हजारपैकी केवळ ५८ हजार इंजेक्शनचा साठा गोठवण्यात आला आहे. दोष आढळून येण्यापूर्वीच रुग्णांना इंजेक्शन दिले गेले. परिणामी रुग्णांना काही रिअ‍ॅक्शन होण्याची भीती व्यक्त होत आहे; परंतु एकाही रुग्णाकडून काही तक्रार आलेली नसल्याचा दावा घाटी प्रशासनाने केला आहे.
रॅनिटिडीन नावाचे संबंधित सदोष इंजेक्शन वापरण्यात येऊ नये, असे २२ नोव्हेंबर रोजी वॉर्डांमध्ये कळविण्यात आले, तरीही अनेक इंजेक्शन वॉर्डांमध्येच राहिले. औषध प्रशासनाने २० हजार इंजेक्शनचा साठा २६ नोव्हेंबरला गोठवला होता. उर्वरित इंजेक्शन्स वॉर्डातून परत घेण्याचे काम मंगळवारी करण्यात आले. त्यातून ३८ हजार इंजेक्शन्स औषधी भांडारकडे परत आले. तेव्हा गोठविलेल्या इंजेक्शनची आकडेवारी ५८ हजारांपर्यंत गेली. उर्वरित इंजेक्शनचे काय झाले, याचा घाटी प्रशासनाने गुरुवारी आढावा घेतला. त्यातून २२ हजार इंजेक्शनचा गेल्या काही दिवसांत वापर झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
घाटी रुग्णालयाला ‘हाफकिन’कडून आॅक्टोबरमध्ये ८० हजार इंजेक्शनच्या चार बॅचचा पुरवठा करण्यात आला होता. अनेकदा रुग्ण काही खाऊ शकत नाही. प्रतिजैविकांचे इंजेक्शन दिल्यानंतर अनेकदा रुग्णांच्या पोटात आग होते. रुग्णांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. अशावेळी रुग्णांना रॅनिटिडीन इंजेक्शन दिले जाते. घाटीतील अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभागासह विविध वॉर्डांमध्ये या इंजेक्शनचे वाटप करण्यात आले होते. इंजेक्शनचा वापर होत असताना २२ नोव्हेंबर रोजी काही इंजेक्शनमध्ये बुरशीसदृश काळा भाग कर्मचाऱ्यांना आढळून आला. त्यामुळे इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याची सूचना करण्यात आली. इंजेक्शनच्या आरटी १८२४, १८२२, १८२३ यामध्ये प्रामुख्याने हा दोष आढळला. या बॅचसह खबरदारी म्हणून आरटी १८२६ या बॅचचा वापरही थांबविण्यात आला.
इंदूर येथील नंदानी मेडिकल लॅब्रोटरिस प्रा. लि. ने या इंजेक्शनचे उत्पादन घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाचा तपासणी अहवाल आल्यानंतरच इंजेक्शनमधील नेमका दोष स्पष्ट होणार आहे. इंजेक्शनच्या उत्पादनात दोष आढळून आल्यास मध्यप्रदेशातील अन्न व औषध प्रशासन पुढील कारवाई करतील, अशी माहिती औषध प्रशासनातर्फे देण्यात आली.
तात्काळ रिअ‍ॅक्शन येते
सदोष औषधी, इंजेक्शनच्या वापरामुळे त्वचेवर चट्टे पडणे, उलट्या-जुलाब यांसह विविध त्रास होत असतो. बहुतांश वेळी त्याची तात्काळ प्रतिक्रिया येत असते; परंतु घाटीतील सदोष इंजेक्शनच्या वापराचा काही त्रास झाला, अशी काहीही तक्रार आलेली नाही आणि यापुढेही येईल, अशी शक्यता नाही. दूरगामी परिणामाचीही शक्यता नाही. त्यामुळे कोणतीही गंभीर परिस्थिती नसल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.

इंजेक्शनची परिस्थिती
बॅच क्रमांक पुरवठा गोठवला वापर
आरटी १८२२ ८,६०० ८,६०० -
आरटी १८२३ १९,००० १०,१०५ ८,८९५
आरटी १८२४ ३२,८५० २३,८१४ ९,०३६
आरटी १८२६ १९,५५० १५,८३५ ३,७१५
एकूण ८०,००० ५८,३५४ २१,६४६
रुग्णांची काहीही तक्रार नाही
घाटीत ८० हजारपैकी २२ हजार रॅनिटिडीन इंजेक्शनचा वापर झालेला आहे; परंतु यामुळे रुग्णांना काही रिअ‍ॅक्शन झाल्याची अद्याप तक्रार आलेली नाही. आरटी-१८२६ या बॅचमधील इंजेक्शनमध्ये काहीही आढळून आलेले नाही. खबरदारी म्हणून त्याचा वापर थांबविण्यात आला.
- डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

खबरदारीचा उपाय
सगळेच इंजेक्शन सदोष आहेत, असे आताच म्हणता येणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व इंजेक्शनचा साठा गोठविण्यात आला. इंजेक्शन दिल्याने रुग्णांना काही रिअ‍ॅक्शन झाले का, हे पाहावे लागेल. तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होईल,अशी माहिती औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी दिली.

Web Title:  22,000 defective injections were used in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.