वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:24 AM2017-12-14T01:24:43+5:302017-12-14T01:24:59+5:30

कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे.

Waikolin blocked the Irai river flow | वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

Next
ठळक मुद्देसंतापजनक प्रकार : नदीपात्रातच बांधला मातीचा रपटा

रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे.
चंद्रपुरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदी पूर्वी या चांदागडची जीवदायिनी होती तर आता इरई नदी चंद्रपूरकरांची तहान भागवित आहे. असे असतानाही या दोन्ही नद्यांची उद्योगांनी वाट लावली आहे. इरई नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले आहे. बल्लारपूर पेपरमील, चंद्रपूर वीज केंद्रामधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. इरई वाचविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केल्यामुळे अखेर शासनाला याबाबत गंभीर व्हावे लागले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. काही प्रमाणात इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. अजूनही हे काम अपूर्णच आहे. अशातच आता वेकोलिने पुन्हा एक संतापजनक प्रकार केला आहे.
वेकोलिच्या चंद्रपूर शहराला सभोवताल खुल्या व भूमिगत कोळसा खाणी आहेत. वेकोलिच्या चंद्रपूर क्षेत्रांतर्गत दुर्गापूर हे उपक्षेत्र येते. या उपक्षेत्रात पायली, भटाळी येथे खुल्या कोळसा खाणी आहेत. भटाळी कोळसा खाणीकडे जाताना भटाळी गावामधून जावे लागते. इरई धरण- ताडोबा व्याघ्र प्रकल्प या जोडरस्त्याच्या बाजुने भटाळी गावाकडे जाणाºया सिमेंट रपट्याच्या काही अंतरावर केवळ दोन पाईप टाकून इरई नदीच्या पात्रातच मातीचा रपटा बनविला आहे. यामुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र व पाण्याचा प्रवाह अडला आहे. या रपट्यावरून वेकोलिचीवाहने मार्गक्रमण करीत आहेत. वास्तविक, कुठल्याही नदी वा तिच्या प्रवाहासोबत अशी छेडछाड करता येत नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासन, सिंचन विभाग आदींची परवानगी घ्यावी लागते. मात्र असे काहीही न करता वेकोलिने आपल्या स्वार्थासाठी थेट इरईचा प्रवाहच अडवून धरला आहे.

भटाळीजवळच्या इरई नदी पात्रात रपटा करण्यासाठी वेकोलिने कुठल्याही प्रकारची परवानगी मागितलेली नाही. वास्तविक सिंचन विभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही नदीच्या पात्राला हात लावता येत नाही.
- संतोष खांडरे,
तहसीलदार, चंद्रपूर.

इरई नदी वाचविण्यासाठी वारंवार आंदोलने केली. नदीपात्रात बसून सत्याग्रह केला. आता इरई नदीचे खोलीकरण करण्यात येत आहे. असे असताना दुसरीकडे वेकोलिने पात्रातच रपटा तयार करून नदीला अडविले. हा प्रकार संतापजनक आहे.
- कुशाब कायरकर
अध्यक्ष, वृक्षाई संस्था, चंद्रपूर.

वेकोलिने पूल बांधावा
भटाळी गावाकडे जाणाºया मार्गावर सिमेंट रपटा आहे. या रपट्याजवळच वेकोलिने मोठा पुल बांधल्यास इरईच्या पात्राला धक्का लागणार नाही. मात्र पैसे वाचविण्यासाठी तसे न करता सरळ नदीपात्रातच मातीचा रपटा बांधून वेकोलि अधिकारी मोकळे झाले आहेत.
यापूर्वीही केला होता असाच प्रकार
वेकोलिने यापूर्वी माना खाणीजवळ इरई नदीच्या काठावर माती टाकण्यासाठी रपटा तयार केला होता. तेव्हा वृक्षाई, इरई नदी बचाव जनआंदोलन या पर्यावरणवादी संघटनेने त्याला कडाडून विरोध दर्शविला होता. ‘लोकमत’नेही वेकोलिच्या या संताजनक प्रकाराकडे लक्ष वेधले होते.
 

Web Title: Waikolin blocked the Irai river flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.