ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नवे प्रवेशद्वार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:28 PM2018-05-30T23:28:50+5:302018-05-30T23:29:02+5:30

मूल तालुक्यातील सोमनाथ गावाकडील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक व वनविभागाने यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Start the new entrance to the Tadoba Tiger Reserve | ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नवे प्रवेशद्वार सुरू करा

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नवे प्रवेशद्वार सुरू करा

Next
ठळक मुद्देपर्यटकांची मागणी : सोमनाथ प्रवेशद्वारातून पर्यटन विकास

लोकमत न्यूज नेटवर्क
मारोडा : मूल तालुक्यातील सोमनाथ गावाकडील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक व वनविभागाने यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मूल शहरापासून केवळ ९ किमी अंतरावर असलेल्या सोमनाथ परिसराला निसर्गाची देणगी लाभली आहे. वर्षभरातील १० महिने येथे पर्यटकांची मांदियाळी असते. याच परिसरात हेमाडपंथी पुरातन मंदिर असून बाजूला वाहणारा धबधबा आहे. हिरव्याकंच वनराईने पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या परिसरातील डोंगर रांगातून वर्षभर वाहणाऱ्या झºयामुळे पाखरांची किलबिल सुरू असते. या परिसरात वन्यजीवांचे सहजपणे दर्शन होते. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चामोर्शी व गोंडपिपरी या शहरांना जोडणारे मूल शहर हे केंद्रस्थानी आहे. त्यातही दक्षिण-पूर्व मार्गाला जोडणारे मारोडा रेल्वेस्थानक केवळ पाच किमी अंतरावर आहे. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी उभारलेल्या सोमनाथ प्रकल्पाला देशभरात प्रसिद्धी मिळाली. देश-विदेशातून अभ्यासक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतात. सोमनाथ येथून डोणी गावाकडे जाण्यासाठी अनेक वर्षांपासून पाऊलवाटेचा उपयोग केला जातो. या परिसरातील नागरिक याच मार्गाने जंगलात जातात. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून डोनी गावाकडे जाण्याचा हा महत्त्वाचा व सुरक्षित मार्ग होता. एकदा ही टेकडी चढली की व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सोमनाथ प्रकल्पाकडे जाताना दोन किमी अंतराच्या परिघातच वाघ अथवा अन्य वन्यजीवांचे दर्शन सहजपणे घेता येते.
काही वर्षांपूर्वी सोमनाथ येथे रिसोर्ट बांधण्यात आले. शिवाय, रस्ते बांधकामही पूर्ण झाले आहेत. पाण्याची टंचाई नाही. हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. वर्षेभर हजारो भाविक सोमनाथ येथे येतात. पर्यटकांची वर्दळ सुरू असूनही ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी प्रवेशद्वार सुरू करण्यात आले नाही. ताडोबा संरक्षित जंगलात व्याघ्र दर्शनासाठी या मार्गातून प्रवेश दिल्यास निसर्गरम्य सोमनाथ, सोमनाथ सेवा प्रकल्प आणि व्याघ्रदर्शन असा तिहेरी फायदा पर्यटकांना होऊ शकतो. शिवाय बफर झोन क्षेत्रातील युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. वन हा वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची चळवळ गतिमान होवून महसूल मिळू शकतो. त्यामुळे सोमनाथकडून प्रवेशद्वार सुरू करावा, अशी मागणी पर्यटकांनी मागणी आहे.

स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील
ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे देशभरातील पर्यटक जिल्ह्यात येतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात सोमनाथ हे स्थळदेखील आकर्षक आहे. व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी सोमनाथकडील प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटकांची संख्या पुन्हा वाढेल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वार्षिक उत्पन्नात भर पडून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, वन विभागाने यासंदर्भात अजूनही सकारात्मक विचार केला नाही. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

Web Title: Start the new entrance to the Tadoba Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.