इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:45 PM2018-03-22T23:45:43+5:302018-03-22T23:45:43+5:30

इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे.

Satyagraha saturated in the era | इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह

इरईच्या पात्रात बैठा सत्याग्रह

googlenewsNext
ठळक मुद्देखोलीकरणाचे काम रखडले : इरई मातेसाठी निधी द्या हो !

ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : इरई नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही मागील दीड वर्षांपासून केवळ निधीअभावी इरई खोलीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. अर्धवट काम झाल्यामुळे पुन्हा इरई नदीची दुरवस्था होण्याची चिन्हे आहेत. इरईच्या खोलीकरणाचे काम पुन्हा सुरू करावे व नदीला वाचवावे, या मागणीसाठी इरई बचाव जनआंदोलन व वृक्षाईतर्फे गुरुवारी इरई नदी पदयात्रा व नदीपात्रातच बैठा सत्याग्रह करण्यात आला.
वेकोलिचे महाकाय ढिगारे, विविध उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी यामुळे इरई नदी प्रदूषित झाली. तिचे नैसर्गिक पात्रच बदलले. इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला. कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात खोलीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरूच करण्यात आले नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे. तरीही निधीअभावी हे काम बंदच ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात पुन्हा हे काम बंदच ठेवावे लागणार आहे. एकीकडे जिल्ह्यात विकासकामांचा सपाटा सुरू असताना चंद्रपूरच्या जीवदायिनीसाठी निधी मिळू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, इरई नदीच्या खोलीकरणासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व रखडलेले काम पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी वृक्षाई व इरई बचाव जनआंदोलन यांच्या वतीने गुरुवारी सकाळी इरई नदी पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पात्रात बैठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी विविध भजने गाऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात कुशाब कायरकर, अनिता कथडे, रेखा चांभारे, गिता अत्रे, दीपलता कालीवाले, अर्चना बट्टे, संगिता देवतळे, रुपाली टोंगे, प्रिती लांडे, संगिता विधाते, कमल गोहणे, कुसूम झाडे, जोत्स्ना शेंडे, कविता टेकाम, सरिता वारदरकर, सुनिता कडूकर, शैलजा तिवारी, कविता चवरे, छाया ठोंबरे, शशिकला औऊतकर, आशा कायरकर, वंदना गोहणे, भूमी व प्रतिभा कायरकर, अनिल राईकवार, मयूर राईकवार, खुशाल लोंढे, तुकाराम झाडे, घनश्याम येरगुडे, सतीश खोब्रागडे सहभागी झाले होते.
आंदोलनाला पाठिंबा
इरई नदीच्या खोलीकरणासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, संदीप कष्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, मनपाचे माजी सभापती संतोष लहामगे, सुनिता अग्रवाल, जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी बैठा सत्याग्रहाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

Web Title: Satyagraha saturated in the era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.