शेतमाल निर्यातीतून मिळवा समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:13 PM2018-03-18T23:13:27+5:302018-03-18T23:13:27+5:30

शेतमाल निर्यातीबाबतच्या कायद्यातील किचकटपणा दूर होवून नियम सोपे झाले आहेत. निर्यात प्रक्रियेत सुसुत्रता आली आहे. सर्वसामान्य शेतकरीही आता अतिशय सोपेपणाने आपला शेतमाल निर्यात करु शकतो.

Prosperity to get commodity export | शेतमाल निर्यातीतून मिळवा समृद्धी

शेतमाल निर्यातीतून मिळवा समृद्धी

Next
ठळक मुद्देसंभाजी चव्हाण : निर्यात प्रक्रिया झाली सोपी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शेतमाल निर्यातीबाबतच्या कायद्यातील किचकटपणा दूर होवून नियम सोपे झाले आहेत. निर्यात प्रक्रियेत सुसुत्रता आली आहे. सर्वसामान्य शेतकरीही आता अतिशय सोपेपणाने आपला शेतमाल निर्यात करु शकतो. निर्यातीविषयक गैरसमज दूर सारुन शेतकऱ्यांनी निर्यातदार व्हावे आणि शेतमालाला चांगली बाजारपेठ व दर मिळवावेत, असे विचार विदेश व्यापार महासंचलनालयाचे (डीजीएफटी) उपमहासंचालक संभाजी चव्हाण यांनी केले.
अ‍ॅग्रोव्हिजन फाउंडेशन (नागपूर), प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चंद्रपूर व संयुक्त महासंचालक विदेश व्यापार (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतमाल निर्यात संधी कार्यशाळा व महाराष्ट्र कृषिविकास प्रकल्पांतर्गत खरेदीदार-विक्रेते संमेलनाचे उदघाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डीजीएफटीचे सहायक उपमहासंचालक अनुपम कुमार, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे, कृषी उपसंचालक तपासकर, अ‍ॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे संतोष डुकरे, स्नेहा आईल मिलचे कावडकर, मालु दाल मिलचे अधिकारी व पतजंली कंपनीचे विपणन अधिकारी अश्विन मुसळे व्यासपिठावर उपस्थित होते.
संभाजी चव्हाण पुढे म्हणाले, शेती फक्त हिरवी असून उपयोग नाही. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणे, त्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ व योग्य मूल्य मिळविणे महत्वाचे आहे. यासाठी निर्यात हे महत्वाचे साधन आहे. मात्र निर्यात म्हणजे खुप किचकट गोष्ट, त्यासाठी खुप परवाने लागतात, विदेशातले खरेदीदार पैसे बुडवतात, अशा गैरसमजांमुळे सर्वसामान्य शेतकरी त्यापासून दूर राहतात. प्रत्यक्षात निर्यातीची प्रक्रिया खुप सोपी असून त्यासाठी परवाने लागत नाहीत, आर्थिक संरक्षणापासून शासकीय योजनांपर्यंत अनेक प्रकारचे लाभही उपलब्ध आहेत. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे.
निर्यातक्षम उत्पादन व निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक प्रकारे सहाय्य करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे स्वतंत्र निर्यात धोरणही लवकरच येणार आहे. यासाठी केंद्रामार्फत सहकार्य करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात निर्यात ६० लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. पूर्वी अर्थव्यवस्था कृषीप्रधान होती, आता अर्थव्यवस्था कृषीप्रधान न राहता लोकसंख्या कृषीप्रधान झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी उत्पन्नवाढीसाठी निर्यातीतील संधींचा अधिकाधिक लाभ घेण्याची गरज आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. देशाचे शेतमाल निर्यात धोरण, निर्यात प्रक्रिया, शेतकºयांनी निर्यातदार, कसे व्हावे आदी बाबींविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अनुपम कुमार यांनी शेतमालाची वैशिष्टये, ब्रॅन्डिंग, परकीय ग्राहक कसे शोधावेत, दर निश्चिती, निर्यातीचे टप्पे, त्यासाठी उपलब्ध असलेली संकेतस्थळे यांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. आपला शेतमाल किंवा उत्पादने विक्रीसाठी कधी उपलब्ध असतात, त्या वेळी कोणत्या देशातील खरेदीदारांची मागणी असते व त्यांना कोणत्या गुणवत्तेची उत्पादने आवश्यक असतात हे लक्षात घेवून निर्यातीचे नियोजन करावे, चंद्रपूरमधील सेंद्रिय शेतमाल उत्पादक, तांदूळ, डाळी उत्पादक, उद्योजक यांना सहजपणे विदेशातील बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यवसायिकांनी पुढाकार घेतल्यास यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. विद्या मानकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमाल उत्पादनाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील तांदूळ, कडधान्ये उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळण्याची गरज आहे. जिल्ह्यात ४८ शेतकरी गट व १५ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत, मात्र अद्याप त्या बाल्यावस्थेत आहेत. ही बाल्यावस्था लवकरात लवकर संपविण्याची गरज आहे. काही गटांनी शेतमालाची जिल्ह्याबाहेर विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांसाठी निर्यात हा उत्पन्नवाढीसाठी महत्वाचा उपाय ठरु शकतो. आत्मा मार्फत शेतकºयांना निर्यातक्षम उत्पादनासाठी व विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकºयांना पाठबळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी सेंद्रीय शेतमाल उत्पादन करत आहेत. त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी पतंजली समुहाशी जोडणी करण्याचा प्रयत्न आहे. सेंद्रिय तांदूळ, डाळी ही आपली कस्तुरी आहे, हे ओळखून शेतकºयांनी निर्यातीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाणी व इतर साधन सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बाजारपेठाही उपलब्ध आहेत. कृषी विभागामार्फत यंदा ६० कोटी रुपयांची अवजारे उपलब्ध करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे यांनी दिली.

Web Title: Prosperity to get commodity export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.