ठळक मुद्देहवा होता वंशाचा दिवाकापसाच्या ढिगाऱ्यात ठेवले दडवून

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : वंशाला दिवा हवा, या आकसापोटी आपल्या २७ दिवसांच्या नातीचा आजीनेच गळा आवळून खून केल्याची व नंतर घरातील कापसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवून ठेवल्याची खळबळजनक घटना जिवती तालुक्यातील सोमलागुडा (मरकलमेटा) गावात गुरुवारी उघडकीस आली.
सोमलागुडा (मरकलमेटा) येथील रावसाहेब नारायण राठोड यांची २७ दिवसांची मुलगी अन्नपूर्णा ही घरातून बेपत्ता झाली. याची तक्रार ५ नोव्हेंबर रोजी जिवती पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी नवजात बालिकेचा शोध सुरु केला. घराच्या आजुबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु बालिका मिळाली नाही. रात्रभर शोध घेऊनही बालिका न मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे ठाणेदार रविंद्र नाईकवाड व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरविली. त्यानंतर आजीवर पोलिसांना संशय आल्याने आजी जनाबाई नारायण राठोड हिला पोलिसी हिसका दाखविताच तिने नातीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. रावसाहेब राठोड यांना अन्नपूर्णाच्या रुपाने तिसरे अपत्य मुलगीच झाले होते. त्यामुळे आजी जनाबाई संतापून होती, अशी माहिती आहे. पोलिसांनी आरोपी जनाबाई नारायण राठोड(६०) यांच्यावर भांदविच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.