दारुविक्रीविरूद्ध केळझर येथील महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:15 PM2017-10-05T23:15:39+5:302017-10-05T23:15:58+5:30

आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने संस्कारित पिढी निर्माण व्हावी, असे अनेकांच्या आई- वडिलांना वाटते. मात्र परिसरातील वातावरण दूषित होत गेले तर संस्कारक्षम बालके घडणे अशक्य आहे.

Elgar of women in Kelzer against Alcohol | दारुविक्रीविरूद्ध केळझर येथील महिलांचा एल्गार

दारुविक्रीविरूद्ध केळझर येथील महिलांचा एल्गार

Next
ठळक मुद्देतंटामुक्त समिती झाली सक्रिय : दारुबंदीसाठी महिलांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने संस्कारित पिढी निर्माण व्हावी, असे अनेकांच्या आई- वडिलांना वाटते. मात्र परिसरातील वातावरण दूषित होत गेले तर संस्कारक्षम बालके घडणे अशक्य आहे. हेच हेरुन मूल तालुक्यातील केळझर येथील महिलांनी गावात पसरलेले व्यसनाधीनतेचे वाढलेले प्रस्थ उखडून टाकण्याचा चंग बांधला. हातभट्या व देशी दारुची होणाºया बेभाव विक्रीवर पायबंध घालण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सुरेखा चुनारकर व त्यांच्या सहकारी महिलांनी एल्गार पुकारला. त्यामुळे आश्चर्य काय, दारुची अवैध विक्री करणाºयाचे धाबेच दणाणले.
महिलांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र त्या आया घाबरल्या नाही. पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याचे बघून गावातील ७५ महिला जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना भेटून दारुबंदीसाठी सहकार्य मागितले. गावात वाढत चाललेल्या व्यसनाधिनतेत भविष्यातील भावी पिढी गारद होऊ नये, यासाठी मुलांच्या भवितव्यासाठी आयांचा दारुबंदीसाठीचा एल्गार कौतुकास्पद व प्रेरणादायी होता. केळझर हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजले जाते. तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या या गावात हातभट्या तसेच देशी दारुची बेभान विक्री करण्याची जणू स्पर्धाच दिसून येते.
या गावात काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात दारूविक्री व्हायची. मात्र १५ आॅगस्टला महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील सुरेखा चुनारकर यांनी निवड झाली. तेव्हा त्यांनी गावात गावठी दारु व देशी दारुचे प्रस्थ वाढत असून भविष्यात आपली मुले व्यसनाधिनतेकडे वळतील यासाठी पुरुषाऐवजी आपणच कंबर कसली पाहिजे, हा विचार काही महिलांच्या मनात आला. यामुळे व्यसनाधिनतेचा समूह उच्चाटन करण्याचा निर्धार महिलांनी केला.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सुरेखा चुनारकर यांच्या समवेत सरपंच सुनिता मानकर, गावातील महिला सुषमा मानकर, उज्ज्वला शेंडे, सरिता डोंगरे, शिला निमगडे, वच्छला खोब्रागडे, कमला रायपूरे, सरला निकोडे, गिता निकोडे, मंगला निकोडे, निता भेंडारे आदी महिलांनी दारुबंदीसाठी एल्गार पुकारला. त्यांनी गावातील दारुच्या १० ते १२ हातभट्ट्या उद्धवस्त केल्या. २५ लोकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र पोलिसांकडून काही प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचे बघून ७५ महिला जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची भेट घेऊन गावातील अवैध दारुविक्रीबाबत माहिती दिली. तेव्हा पोलीसही सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले. गावात आजही अवैध दारुची विक्री केली जात आहे. महिलांना अश्लील भाषेत बोलून जिवे मारण्याची धमकी देतात. मात्र महिलांचा एल्गार कायम आहे.

Web Title: Elgar of women in Kelzer against Alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.