कन्यारत्न पुरस्काराचे वितरण

By admin | Published: November 13, 2016 12:44 AM2016-11-13T00:44:02+5:302016-11-13T00:44:02+5:30

तालुक्यातील उपरी ग्रामपंचायतीने १ एप्रिल २०१६ पासून मुलगी जन्माला आलेल्या पालकांना कन्यारत्न पुरस्काराने सन्मानित करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Distribution of Kanyaratnama Award | कन्यारत्न पुरस्काराचे वितरण

कन्यारत्न पुरस्काराचे वितरण

Next

उपरी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम : जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
सावली : तालुक्यातील उपरी ग्रामपंचायतीने १ एप्रिल २०१६ पासून मुलगी जन्माला आलेल्या पालकांना कन्यारत्न पुरस्काराने सन्मानित करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून कन्यारत्न पुरस्काराचे वितरण केले.
उपरी ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०१६ च्या ग्रामसभेत ठराव घेवून १ एप्रिल २०१६ पासून आपल्या गावात मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाने १८ वर्षापर्यंत ३३३३ रुपये बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वनिता पुरुषोत्तम भोयर, लता सत्यवान सातपुते, शालु मारोती भोयर या दाम्पत्यांना मुलगी जन्माला आली. उपरीचे सरपंच आशीष मनबत्तुलवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सदर तिनही महिलांना कन्यारत्न पुरस्काराने सन्मानित केले. सोबतच उपरी ग्रामसेवा पुरस्कार म्हणून ७५ वर्षाचे गृहस्थ मारोती धर्मा चंदनखेडे यांना ५५५५ रुपये रोख तसेच शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले. शिवाय उत्कृष्ठ शिक्षक पुरस्काराने जि.प. उच्च प्राथमिक शाळा उपरीचे सहा. शिक्षक भारत रामटेके यांचाही यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले, उपरी ग्रामपंचायतीने चालविलेला हा उपक्रम कदाचीत महाराष्ट्रातील पहिलाच असावा. एकीकडे मुलींना गर्भातच मारण्याची प्रथा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असताना उपरीचे तरुण सरपंच आशीष मनबत्तुलवार यांच्या पुढाकाराने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या शासनाच्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात ग्रामपंचायतस्तरावर केल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी रात्रीच्या कार्यक्रमासाठी आल्यामुळे मला गाव पाहता आले नाही. परंतु दुसऱ्यांदा येऊन गावाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले.
यावेळी मंचावर सावलीचे तहसीलदार भोयर, सहायक पोलीस निरीक्षक के.के. गेडाम तसेच परिसरातील सर्वच पक्षाचे गणमान्य पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्मित युवा मंडळ उपरी व ग्रामपंचायत उपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपरीचे सरपंच आशीष मनबत्तुलवार यांनी केले. संचालन देवनाथ कोठारे आणि आभार मंडळाचे अध्यक्ष खुशाल बोदलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनेकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Distribution of Kanyaratnama Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.