नद्यांमध्ये पुन्हा उदासीनतेचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:33 AM2018-11-26T00:33:51+5:302018-11-26T00:34:22+5:30

चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले.

Desert waste again in rivers | नद्यांमध्ये पुन्हा उदासीनतेचा कचरा

नद्यांमध्ये पुन्हा उदासीनतेचा कचरा

googlenewsNext
ठळक मुद्देकोण करणार पवित्र? : प्रशासनाला नद्यांच्या स्वच्छतेचा विसर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले. वेकोलिचे ओव्हरबर्डन, नागरिकांचे अतिक्रमण व दिवसागणिक वाढत जाणारा गाळ, यामुळे या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्यच बाधित झाले. इरई नदीचे खोलीकरण करून तिला पुनरुज्जिवित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र खोलीकरण मध्येच बंद केले. आता इरई आणि झरपट या दोन्ही नद्या पुन्हा प्रदूषित होत असल्याचे दिसत आहे.
इरई नदीची परिस्थिती वाईट होण्यामागे प्रशासनासोबत नागरिकही कारणीभूत आहेत. वेकोलिने तर सर्व सीमाच पार केल्या. या नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले. मात्र प्रशासनाला कधी जाग आली नाही. बल्लारपूर पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. काही वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. काही अंतरापर्यंत हे काम करण्यात आले. मात्र मध्येच हे काम सोडून देण्यात आले. आता पुन्हा इरई नदीचे पात्र दूषित होत आहे. केरकचरा नदीतच टाकला जात आहे.
झरपट नदी तर पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. मात्र या नदीचा डोळ्यादेखत नाला करून टाकला आहे. झरपट नदी वाचविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकाºयाने धडपड केली नाही. उलट ती प्रदूषित करणाºयांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शहरातील ज्या भागात नदीच्या प्रवाहाने स्पर्श करून पवित्र केले, तेथील पावित्र्य कायम न राखता सांडपाणी नदीत सोडण्यात आले.
याशिवाय शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या झरपटमध्येच विलीन करून स्थानिक राज्यकर्त्यांनी संपूर्ण नदीचे वाटोळे केले आहे.
उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडला जातो. मात्र वाहती नदी डोळ्याआड करून तिचे वाटोळे होत असतानाही जीवनदायिनींना वाचविण्यासाठी प्रशासनाला गदगद हालविले जात नाही. बोटावर मोजण्याएवढ्या एकदोन जणांनी आपआपल्या परीने थोडेफार प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना नेत्यांची फारशी साथ मिळाली नाही.
लहान नदीचेही जतन नाही
१५ कि.मी. एवढी कमी लांबी असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. उलट नदीची गटारगंगा कशी करता येईल, याचाच पध्दतशीर प्रयत्न झाला. या नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. पात्रातील बारीकसारिक खडकंही गायब करण्यात आले. आता तर नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूच दिसत नाही. वाळूऐवजी चिखल, घराघरातून आणि नालीतून आलेल्या मळाचे साम्राज्य दिसते. शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम, अंचलेश्वर गेट, संतोषी माता मंदिर परिसर, ताडबन परिसर, हनुमान खिडकी परिसर, पठाणपुरा वार्ड या भागातील सांडपाणी नदीत सोडले जाते. मच्छीनाल्याचेही काही पाणी रामाळा तलावात जाते आणि बाकी सर्व पाणी झरपट नदीतच मिसळते. याशिवाय शहरातील कचरा, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्याही नदीतच टाकल्या जातात. विशेष म्हणजे, शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या पूर्वीपासून झरपट नदीतच विलीन करण्यात आल्या आहेत. या नदीत प्राणवायूचे प्रमाण अत्यंत कमी आणि सल्फेट, हेवी मेटल अशा घातक रसायनाचे प्रमाण अधिक आढळून आले होते. कोणत्याही परिस्थितीत झरपट नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही.

Web Title: Desert waste again in rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी