संविधान जन्माला आले, ही महत्त्वाची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:16 PM2018-02-12T23:16:52+5:302018-02-12T23:17:24+5:30
१९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : १९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला. आज कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीत आपण सुखी नाही. शिक्षणात अक्कल नाही, खरे आरोग्य नाही. मातीत राबणारा मरतो आहे, हे दुर्दैव आहे. निवडणुका हिंदू अन् मुसलमान अशा होतात. सत्तर वर्षात आपण भारतीय होऊ शकलो नाही. हिंदूराष्ट्र कशासाठी, भारत राष्ट्र कुणी मागतो का? माझं देशावर प्रेम आहे. या देशात संविधान जन्माला आले, ही अत्यंत महत्त्वाची घटना. पण संविधान पाळलं जात नाही, हे दु:ख आहे. धर्मामधला पैसा काढा. श्रद्धा मनात पाहिजे. जे लोक जात, पंथ पाळतात, ते संविधानविरोधी लोक होत, असे सडेतोडपणे मत संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.
सूर्यांस साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी विचारपीठावर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार, सूर्यांशचे अध्यक्ष कवी इरफान शेख, स्वागताध्यक्ष तनुजा बोडाले, कार्याध्यक्ष डॉ. विद्याधर बन्सोड, संजय वैद्य, सीमा भसारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. शोभणे म्हणाले, छोटी संमेलने व्हावीत, याचा मी पाईक आहे. असे सांगून सूर्यांश टीमचे स्वागत केले. अशोक पवारांनी धर्माचे धर्मांतर इतके वेळा व्हावे की माणूस मोठा व धर्म लहान व्हावा. आपण भयानक धावत आहोत. पुस्तकं निघाली पाहिजेत. त्यातून माणसं उभी राहतात.
संचालन उपाध्यक्ष सीमा भसारकरांनी तर आभार सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. याप्रसंगी सचिव प्रदीप देशमुख, प्राचार्य डॉ. इंगोले, निता कोंतमवार, गीता रायपुरे, कोषाध्यक्ष रंगनाथ रायपुरे, प्रभाकर धोपटे, किशोर तेलतुंबडे, संगिता पिजदूरकर, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. विजय सोरते, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, विवेक पत्तीवार, देवानंद साखरकर आदी उपस्थित होते. यावेळी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.