पिण्याच्या पाण्यासाठी जिवती तालुक्यातील नागरिकांची वणवण !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 03:11 PM2024-05-07T15:11:38+5:302024-05-07T15:12:32+5:30

नळयोजना ठप्प : हातपंप बंद; माणिकगड पहाडावर विकत घ्यावे लागते पाणी !

Citizens of Jivati taluka are fighting for drinking water! | पिण्याच्या पाण्यासाठी जिवती तालुक्यातील नागरिकांची वणवण !

Citizens of Jivati taluka are fighting for drinking water!

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती :
पावसाळ्यात शहरातील व्यक्तीने अचानक माणिकगड पहाडावरील गावांना भेट दिली की तिथले नैसर्गिक सौंदर्य पाहून हुरळून जातात. मात्र, उन्हाळ्यात येथील माणसे पाण्याविना कशी होरपळतात, याचा साधा मागमूसही त्यांना नसतो. जिवती तालुक्यातील १४७ पैकी दोन वर्षात फक्त १८ कामे पूर्ण झाली. येल्लापूर हे टंचाईग्रस्त गावांपैकी जिल्ह्यातील एक प्रातिनिधिक गाव. येथील नळयोजना आठ महिन्यांपासून ठप्प, विहीर ढासळलेली, १५० ते २०० रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागते. जलजीवन मिशन योजनेने गावकऱ्यांचा अपेक्षाभंग केल्याची येल्लारपूरची व्यथा आहे.

मार्च महिना लागताच माणिकगड पहाडावर पाणीटंचाईची चाहूल सुरू होते. एप्रिल, मे, जून म्हणजे प्रचंड यातना हे आजवरचे चित्र कधी बदलले नाही. येल्लापूरसह अनेक गावांतील विहिरी कोरड्या झाल्या आहेत.

गावकऱ्यांना नेमके काय हवे ?
तलावाखालील विहिरींना भरपूर पाणी लागते. त्यामुळे शासनाने विहीर खोदताना येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. हातपंपही उपयुक्त ठरू शकतात; पण काही हातपंप चुकीच्या ठिकाणी खोदण्यात आली. गावातील विहिरींचे पारंपरिक जलस्रोत व सोबतीला जलजीवन मिशन योजना यशस्वीपणे राबवली, तर उन्हाळ्याची अडचण दूर होऊ शकते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाणी मिळत नसल्याने काही कुटुंबे उन्हाळ्यात सोडतात गाव
पहाडावरील अनेक गावांत जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत कोट्यवधी खर्च झाले; परंतु पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे काही कुटुंब उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येने काही महिने गाव सोडतात व पावसाळ्यात परत येतात. येल्लापूर हेही त्यापैकीच एक गाव. जलजीवन मिशनची कामे अर्धवट पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

रात्री-बेरात्री महिलांची पायपीट
एकच विहिरीतील पाणी पिण्यायोग्य असल्याने बैलबंडी, ऑटो किवा दुचाकीच्या साहाय्याने पाणी आणून तहान भागवतात. ज्यांच्याकडे ही साधने नाहीत त्यांना पाण्यासाठी ४०० मीटर दूर पायपीट करावी लागते. प्रसंगी पहाडाखालील गावांतून २०० लिटर पाण्यासाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. महिलांना पाण्यासाठी रात्री-बेरात्री उठावे लागते.


पाच हातपंप नावापुरतेच !
गावात पाच हातपंप आणि सहा विहिरी आहेत; पण तलावाखालील एकाच विहिरीला पाणी आहे. उर्वरित सर्वच विहिरींनी तळ गाळला, पाणी मिळणे कठीण झाले. जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत सुरू असलेला पाणीपुरवठा आठ महिन्यांपासून बंद आहे, गावाजवळील आणखी एक विहीर खूप उपयुक्त होती. ती ढासळून एक वर्षाचा कालावधी लोटला; पण प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.


जलजीवन मिशनच्या कामाचा पाठपुरावा करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलमध्ये काम पूर्ण होईल, असे सांगितले होते; परंतु तसे होऊ शकले नाही. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. 
- सुमित्रा मेश्राम, सरपंच, ग्रामपंचायत, येल्लापूरकोट


मागील आठ महिन्यांपासून गावातील नळयोजना बंद आहे. पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले. हा दरवर्षीचा त्रास कधी दूर होईल, याची महिला वाट पाहत आहेत. सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
-इंदू शिनगारे, गृहिणी, येल्लापूर


पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पहाडावर वरपांगी कामे उपयोगाची नाहीत.
ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी विहिरी खोदाव्यात. उन्हाळ्यापूर्वीच योग्य तयारी करून योजना अमलात आणावी.
- प्रशांत कांबळे, सदस्य, ग्रा. पं. येल्लापूर
 

Web Title: Citizens of Jivati taluka are fighting for drinking water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.