ब्रह्मपुरीकरही उन्हाच्या काहिलीने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:08 AM2019-04-29T00:08:36+5:302019-04-29T00:10:13+5:30

मागील वर्षी जगात तर मतदानाच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिलला देशात उष्णतेचा उच्चांक गाठलेल्या ब्रम्हपुरी शहरात आता सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ग्रामीण भाग असला तरी उन्हाच्या तडाख्याने येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

Brahmapuri also suffered from the heat of the summer | ब्रह्मपुरीकरही उन्हाच्या काहिलीने बेजार

ब्रह्मपुरीकरही उन्हाच्या काहिलीने बेजार

googlenewsNext
ठळक मुद्देपारा चंद्रपूरच्याही पुढे : भविष्याच्या दृष्टीने उपाययोजनांची गरज

रवी रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : मागील वर्षी जगात तर मतदानाच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिलला देशात उष्णतेचा उच्चांक गाठलेल्या ब्रम्हपुरी शहरात आता सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ग्रामीण भाग असला तरी उन्हाच्या तडाख्याने येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
रस्ते दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत निर्मनुष्य होत असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असून आता मे महिनाही तीन दिवसानंतर सुरू होईल. एप्रिल महिन्यातच ब्रह्मपुरीचा पारा ४६ अंशापार गेला आहे.
मे महिना अजूनही शिल्लक असल्याने ब्रम्हपुरीवासीयांच्या उरात उन्हाची धडकी भरली आहे. वर्तमान काळातच भविष्यकाळाचा वेध घेऊन सर्वांनी सतर्क होऊन सदर महत्वपूर्ण समस्येच्या निराकरणासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
ब्रम्हपुरी तालुका जरी जंगलाने व्यापलेला असला तरी त्यामानाने शहरात वृक्षांचा अभाव आहे. शहरातील रिकाम्या जागा अधिक असून त्या ओसाड पडल्या आहेत. तेथे वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. केवळ ग्रीन सिटी म्हणून कागदी उपचार नको आहे. ब्रह्मपुरीच्या वाढत्या तापमानामुळे आताच यावर गंभीरतेने विचार होणे गरजेचे आहे.
दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ
ब्रम्हपुरीची विद्यानगरी, आरोग्यनगरी, सांस्कृतिक नगरी म्हणून पंचक्रोशीत ओळख असल्याने येथील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहे. शहराच्या सभोवताली जवळपास १५ राईस मिल आणि कुकसावर आधारित खाद्य तेलाची निर्मिती करणारा आॅईलचा कारखाना आहे. यामुळे शहरातील प्रदूषण सातत्याने वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणाला वेळीच आवर घातला ााही किंवा काही ठोस उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात उष्णतेची तीव्रता वाढून तापमानात वाढ होतच राहील आणि याचा विपरीत परिणाम नागरिकांना भोगावा लागेल.
हवामान केंद्राचे ठिकाण बदलावे
तापमानाची नोंद करण्याकरिता इंग्रज काळापासून तहसील कार्यालय परिसरात यंत्र बसविण्यात आले होते. तत्कालीन परिस्थितीनुसार ते ठिकाण योग्य होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सदर तापमानाची नोंद करणारे हवामान केंद्राचे ठिकाण चुकीचे असल्याचे मत भूगोल अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. तहसील कार्यालयाच्या सभोवताली दाट वस्ती निर्माण झाली असून उंच-उंच इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे नोंद केलेले तापमान अचुक असेल, या शाश्वती देता येत नाही. हवामान केंद्राचे ठिकाण बदलविणे आवश्यक आहे.

तालुक्यात चुनखडीचे खडक अधिक
ब्रम्हपुरी तालुका ‘लेटेराईट मृदे’चा बनलेला असून या मृदेतून ‘चुनखडी’चे अस्तित्व निघून गेल्याने फक्त खडक बाकी आहे. ते अत्यंत तापतात, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. परंतु हे जरी खरे असले तरी भविष्याच्या दृष्टीने त्यावर काही उपाययोजना करून त्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

रविवारी चंद्रपूरच्या तापमानाने गाठला उच्चांक
चंद्रपूर : चंद्रपूरने तापमानाबाबत आपला राजेशाही रविवारी पुन्हा कायम केली. आतापर्यंत राज्यात अकोला सर्वाधिक तापमानाचे शहर ठरत आले होते. आज चंद्रपूरने तापमानात अकोल्याशी बरोबरी साधली. दोन्ही शहराचे रविवारचे तापमान ४७.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मागील पाच दिवसांपासून चंद्रपूरच्या तापमानात दररोज सुमारे एक ते दीड अंशाने वाढ होत आहे. गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस, शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस, शनिवारी ४६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रविवारी ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज चंद्रपूरने तापमानात पुन्हा उच्चांक गाठला.

Web Title: Brahmapuri also suffered from the heat of the summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान