डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने मिळाली अस्मिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:27 PM2017-12-05T23:27:08+5:302017-12-05T23:27:59+5:30

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषम समाजव्यवस्थेशी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा लढा व्यापक केला.

Asmita has received the struggle of Dr. Babasaheb Ambedkar | डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने मिळाली अस्मिता

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने मिळाली अस्मिता

Next
ठळक मुद्देआज महापरिनिर्वाण दिन : जिल्ह्यात विविध संघटनांकडून आदरांजली

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषम समाजव्यवस्थेशी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा लढा व्यापक केला. त्यांच्या संघर्षामुळेच कोट्यवधी जनतेला अस्मिता आणि दिशा मिळाली. नवी पिढी आता बाबासाहेबांच्या विचारांचा कालसापेक्ष विचार करून वाटचाल करीत आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विविध संघटनांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले असून, दिवसभर व्याख्यान, चर्चासत्र आणि विधायक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित जनतेला सन्मानाने उभे राहण्याची ताकद दिली. नागपूर आणि चंद्रपूर येथे ऐतिहासिक धम्म सोहळा घेऊन परिवर्तनाचा संदेश दिला. हजारो वर्षांच्या गुलामगिरीला मुठमाती देवून उजेडाचा वारसा बहाल केला. भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्यायाला अनुसरून क्रांतिकारी तरतुदी केल्या. त्यामुळे कोट्यवधी जनतेला विकास करण्याची संधी मिळाली. डॉ. आंबेडकरांचा चंद्रपूर शहराशी ऐतिहासिक संबंध होता. सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते या शहरातून तयार केले. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे नाव नव्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभे आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीवर धर्मांतर सोहळा घेण्याची क्रांतिकारी घटना या देशात पहिल्यांदाच घडली. या ऐतिहासिक लढ्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. नागपुरातील धर्मांतर सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी चंद्रपूर शहराला प्राधान्य दिले. १९५६ मध्ये धम्मदीक्षा सोहळा चंद्रपुरात घेतल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले होते. हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या शोषित समाजात अस्मिता पेरण्याचे काम चंद्रपुरातील धम्मदीक्षा सोहळ्याने केले. यातून अनेक पिढ्या परिवर्तनाच्या चळवळीत सामील झाल्या. राजकीय वाटचाल भरकटले असले, तरी सामाजिक व सांस्कृतिक संघर्षासाठी दलित समाज आजही नव्या उमेदीने लढा देत आहे. बदलत्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि, सांस्कृतिक वातावरणात डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचा परिवर्तनाचा विचार समाजमनात रुजविण्याचे काम करीत आहे. व्यवस्थेशी संघर्ष करण्याचे माध्यम बदलले. नव्या माध्यमांचा वापर करून संविधानाला अपेक्षित समाज घडविण्यासाठी संघर्ष करणाºया अनेक संघटना, व्यक्ती, कार्यकर्ते प्रामाणिकपणे कार्य करीत असल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिवर्तनवादी उपक्रम राबवून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
चंद्रपुरात आज अस्थिकलश यात्रा
समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शत्तकोतर जयंती महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनापासून यात्रेची सुरुवात होईल. कस्तुरबा रोड, गिरणार चौक, गांधी चौक मार्गातून ही यात्रा बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पोहचेल. विविध संघटनांकडून पुतळ्याला मार्लापण केल्यानंतर बुद्ध वंदना होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानचे गौतमी डोंगरे, संयोजक प्रवीण खोब्रागडे व अन्य मान्यवर उपस्थित राहतील. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Asmita has received the struggle of Dr. Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.