अवैधरित्या रेती साठवणाऱ्यांवर चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:49 PM2018-02-08T23:49:45+5:302018-02-08T23:50:44+5:30

अवैध गौण खनिजाचे उत्खनन, गौण खनिजांची वाहतूक करणे, अवैधरित्या रेतीचा साठा करून ठेवणे, याविरुध्द तहसील प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे.

An arc on illegal sand collectors | अवैधरित्या रेती साठवणाऱ्यांवर चाप

अवैधरित्या रेती साठवणाऱ्यांवर चाप

Next
ठळक मुद्देचंद्रपूर तहसील आक्रमक : ७४ लाख ७६ हजारांचा दंड

ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : अवैध गौण खनिजाचे उत्खनन, गौण खनिजांची वाहतूक करणे, अवैधरित्या रेतीचा साठा करून ठेवणे, याविरुध्द तहसील प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत अवैधरित्या रेतीचा साठा करणाऱ्यांविरुध्द कारवाई करीत तब्बल ७४ लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या चंद्रपुरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. यासाठी लागणारी रेती अवैधरित्या आणली जाते. त्याची मोकळ्या जागेत साठवणूक केली जाते. याशिवाय तालुक्यात गौण खनिजांचे अवैधरित्या उत्खननही केले जात आहे. त्यामुळे चंद्रपूरचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी याविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली असून आपल्या भरारी पथकाला कामाला लावले आहे.
दरम्यान, चंद्रपूर वनराजिक महाविद्यालय येथे वन अकादमीचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा साठा केल्याची माहिती तहसीलदार संतोष खांडरे यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी धाड टाकली असता तब्बल ८५० ब्रास रेतीचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करून पंचनामा करण्यात आला. या साठ्याबाबत बांधकाम कंत्राटदार सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी, नागपूर यांच्याकडे कोणतेही वैध पुरावे आढळून आले नाही. त्यामुळे तहसीलदार खांडरे यांनी सोमवारी एक आदेश निर्गमित करून या कंत्राटी कंपनीवर ७१ लाख ४० हजार रुपये दंड ठोठावला.
त्यानंतर बंगाली कॅम्प परिसरातील अष्टभुजा वॉर्डातही रेतीचा साठा असल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळाली. तेथेही पथकाने धाड टाकून ४० ब्रास रेती जप्त केली. ही कारवाई नायब तहसीलदार सतीश साळवे, ए.बी. भास्करवार, मंडळ अधिकारी राजू धांडे, तलाठी अशोक मुसळे, तलाठी दुवावार यांनी केली. ही रेती भूदेवसिंग बिंद्रासिंग ठाकूर रा. सरकारनगर यांची असून त्यांच्याकडे रेतीबाबत कुठलेही वैध पुरावे आढळले नाही. त्यामुळे त्यांच्यावरही तीन लाख ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे रेतीची अवैधरित्या साठवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गौण खनिजाचे उत्खनन
चंद्रपूर तालुक्यात अलिकडे गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन केले जात आहे. विशेषता तालुक्यातील ग्रामीण भागात गौण खनिजांची अवैध वाहतूक होताना दिसून येते. तालुका प्रशासनाने याकडेही गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकारावर आळा बसवावा, अशी मागणी आहे.

गौण खनिजाची वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुध्द तीव्र मोहीम राबविली जात आहे. कुठेही असा प्रकार दिसल्यास तक्रार करावी. तत्काळ कारवाई केली जाईल.
- संतोष खांडरे,
तहसीलदार, चंद्रपूर.

Web Title: An arc on illegal sand collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.