चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:10 PM2018-06-28T14:10:18+5:302018-06-28T14:11:38+5:30

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

The achievements of Everestveer of Chandrapur are inspirational for the youth | चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी

चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी

Next
ठळक मुद्देराष्ट्रपती कोविंद यांच्याकडून कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
या विद्यार्थ्यांनी आज रायसिना हिल्स स्थित देशाची शान असणाऱ्या राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. मनीषा धुर्वे, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम आणि प्रमेश आडे या एव्हरेस्टवीर विद्यार्थ्यांचा प्रचंड आत्मविश्वास पाहून राष्ट्रपतींनीही त्यांच्याशी मनमोकळया गप्पा मारल्या. एव्हरेस्ट सफरीतील त्यांचे विविध किस्से जाणून घेताना राष्ट्रपतींची मुद्रा कधी गंभीर तर कधी भावुक होत असल्याचे राष्ट्रपती भवनाने अनुभवले.
चंद्रपूरच्या या विद्यार्थ्यांनी उणे ४५ अंश सेल्सिअस वातावरणात एव्हरेस्ट शिखर सर केले, ही कौतुकास्पद व अभिमानाची बाब असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील या वारीसाठी निवड झालेले मात्र काही कारणास्तव एव्हरेस्ट सर करताना माघार घ्यावी लागलेले इंदू कन्नाके, अक्षय आत्राम, शुभम पेंदोर, छाया आत्राम आणि आकाश मडावी हे या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले .

शुक्रवारी पंतप्रधानांना भेटणार एव्हरेस्टवीर
हे विद्यार्थी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहेत. यापूर्वीच पंतप्रधानांनी देशवासीयांसोबत संवाद साधताना या विद्यार्थ्यांच्या एव्हरेस्ट चढाईचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून कौतुक केले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

Web Title: The achievements of Everestveer of Chandrapur are inspirational for the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.