नोकरी सोडून व्यवसाय करु का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:12 PM2017-08-09T17:12:00+5:302017-08-09T17:12:49+5:30

असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर निर्णय कसा घ्याल?

what to do? job or business? | नोकरी सोडून व्यवसाय करु का?

नोकरी सोडून व्यवसाय करु का?

Next
ठळक मुद्देनिर्णय घेताना माझा निर्णय चुकला तर काय अशी परिणामांची यादी करणं आणि कोणाचा तरी आपल्या निर्णयासाठी पाठिंबा मिळवणं हे कटाक्षाने टाळा.

-योगिता तोडकर

एक दिवस संदीप माझ्याकडे आला, खूप अस्वस्थ होता. मला म्हटला नोकरी सोडून व्यवसाय करायची माझी इच्छा आहे. घरातल्यांचा मी व्यवसाय करावा या गोष्टीला पूर्ण विरोध आहे. त्यांचे म्हणणे आहे त्यात मोठी जोखीम आहे. जर तो चालला नाही तर सगळ्याच बाजूंनी, आर्थिक, सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक नुकसान होईल.  खूपजणांशी चर्चा केली, खूप विचार केला, पण कळत नाहीये काय करावं. गोंधळून गेलोय.

मी त्याला म्हटलं कोणताही निर्णय घेताना त्याच्या परिणामांची भीती हे निश्चितच आहे. पण आपण जेंव्हा असं म्हणतो की, मी निर्णय घेण्यासाठी विचार करतोय तेंव्हा हे पडताळून पाहावं की आपण त्याच्या वाटणार्‍या परिणामांच्या  भीतीभोवती घुटमळतोय की निर्णयाबद्दल चारही बाजूंनी खरंच विचार करतोय.

निर्णय घेताना सगळ्यात अवघड गोष्ट असते ती म्हणजे आपला निर्णय बरोबर आहे का हे ठरवणं. निर्णय हा बरोबर किंवा चूक नसतो. निर्णय हा निर्णय असतो. फक्त तो घेण्यासाठी त्याबददलची योग्य माहिती मिळवून त्यावर काम करणे यासाठी हिम्मत लागते. बहुतेकवेळा वेळा आपण जे करतोय त्यासाठी आपल्या जवळपास असणार्‍यांशी चर्चा करतो, व आपण करतोय ते योग्य आहे असे इतरांनी म्हणण्याची वाट पाहतो.

त्यामुळे निर्णय घेताना माझा निर्णय चुकला तर त्याच्या परिणामांची यादी करणं व कोणाचा तरी निर्णयासाठी पाठिंबा मिळवणं हे कटाक्षाने टाळ. कारण अशा वेळेस मन त्यातच गुंतून राहणे पसंत करते.

कोणताही निर्णय घेताना परिणामांची जबाबदारी घेणं म्हणजे हिम्मत. त्यासाठी निर्णयापूर्वी आपल्याला नेमके काय हवे आहे हे ठरव. त्याचप्रमाणे निर्णय घेताना तुयाकडे  काय पर्याय आहेत हे तपासून पहा. निर्णय घेतल्यावर त्याचे कोणावर व काय परिणाम होतील याचा अभ्यास कर. त्याचप्रमाणे होणारे दुष्परिणाम काळाच्या ओघात भरून निघू शकतील काय हेदेखील पहा. व या सर्व माहितीवर आधारित  निर्णय घे.

मंडळी संदीप प्रमाणेच आपल्यालाही आयुष्याच्या विविध भूमिकांमध्ये निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय घेण्याची हिम्मत म्हणजे विविध पर्याय पडताळणे, पर्यायांचा परिणाम तपासणे, त्यासाठीचे मार्ग शोधणे व त्याची जबाबदारी घेणे इतकेच. यापलीकडे फार वेगळे असे काहीच नाही.

 

( लेखिका समुपदेशक आहेत.)

Web Title: what to do? job or business?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.