सरकार बदलणार का?, दुष्काळ सरणार का?; घटमांडणीच्या भाकिताकडे बळीराजाचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:44 AM2018-04-18T01:44:42+5:302018-04-18T02:02:13+5:30

३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली.

Today ghat mandani: Farmers attention to Bhendwal prophecy! | सरकार बदलणार का?, दुष्काळ सरणार का?; घटमांडणीच्या भाकिताकडे बळीराजाचे लक्ष्य

सरकार बदलणार का?, दुष्काळ सरणार का?; घटमांडणीच्या भाकिताकडे बळीराजाचे लक्ष्य

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज कथन करणार भविष्यवाणी

जयदेव वानखडे

जळगाव जामोद :  बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी  १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सुर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत. तर घटामध्ये राज्यभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून १९ एप्रिलच्या पहाटे यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन करणार आहेत. या भाकीताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली. आणि ती परंपरा या वाघ कुटुंबियांनी आजही जपली आहे. 

या विधीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व आपल्या सहकार्यासह येवून चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटमांडणी करणार आहेत. घटमांडणीनंतर रात्रभर त्या परिसरात कुणीही फिरकत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या समयी घटामध्ये नैसर्गिकरित्या जो काही बदल घडून येतात त्याबाबत दुसर्‍या दिवशी उपस्थित हजारो शेतकर्‍यांच्या समक्ष येणार्‍या हंगामाचे पिकपाण्याचे तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहुल देणारे भाकीत वर्तविण्यात येते.

यावरून यंदा देशाचा राजा बदलतो काय? की तोच कायम राहणार, पृथ्वीवर काही नैसर्गिक अरीष्ट कोसळेल काय, अवकाळी पावसाची शक्यता, गुराढोरांना चारा अन पिण्यासाठी पाणी असेल काय त्याचबरोबर पिकांचे उत्पन्न आणि धान्याच्या भावामधील तेजीमंदीचा उलगडा होणार आहे. तेव्हा यंदाच्या भाकीताविषयी कमालीची उत्सुकता शेतकर्‍यांमध्ये दिसत आहे. ही मांडणी पाहण्यासाठी व भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरात फार मोठा शेतकरी वर्ग याठिकाणी जमतो.
 

अशी होणार घटमांडणी

अक्षयतृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत नियोजित शेतात येतात. त्याठिकाणी मातीचे गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करतात यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवतात त्यावर घागर ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली जाते. तर खड्डयात घागरीचे बाजुला राजा व त्याची गादी म्हणजे पान सुपारी ठेवली जाते. तर मातीच्या घटामध्ये गोलाकार पध्दतीने अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपासी, हिवाळी मुंग, उडीद, करडी, तांदुळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करतात.
धान्य आणि खाद्य पदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसर्‍या दिवशी पहाटे अतिशय सूक्ष्म पध्दतीने अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकीते वर्तविली जातात. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरवतो. 

Web Title: Today ghat mandani: Farmers attention to Bhendwal prophecy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.