बुलडाणा जिल्ह्यात तीन तालुक्यांना पुन्हा गारपिटीचा तडाखा; दोघे जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:22 AM2018-02-14T01:22:12+5:302018-02-14T01:23:28+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात मेहकर, सिं.राजा, चिखली तालुक्यात मंगळवारी पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला.  मेहकर तालुक्यामध्ये बहुतांश भागात पुन्हा १३ फेब्रुवारी रोजी गारपीट होऊन शेतकर्‍यांचे कांदा, गहू, हरभरा, टरबुजाचे अतोनात नुकसान झाले. दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. 

Three Talukas hit again in Buldhana district; Both injured | बुलडाणा जिल्ह्यात तीन तालुक्यांना पुन्हा गारपिटीचा तडाखा; दोघे जखमी 

बुलडाणा जिल्ह्यात तीन तालुक्यांना पुन्हा गारपिटीचा तडाखा; दोघे जखमी 

Next
ठळक मुद्देचिखली, मेहकर आणि सिंदखेडराजा तालुक्यातील २६ गावात अवकाळी पाऊस, गारपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात मेहकर, सिं.राजा, चिखली तालुक्यात मंगळवारी पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. मेहकर तालुक्यामध्ये बहुतांश भागात पुन्हा १३ फेब्रुवारी रोजी गारपीट होऊन शेतकर्‍यांचे कांदा, गहू, हरभरा, टरबुजाचे अतोनात नुकसान झाले. दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. 
दोन दिवसांपूर्वीही तालुक्यात अचानक गारपीट झाली होती. त्यामध्ये २५ गावातील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये गहू, हरभरा, मका, कांदा, संत्रा, आंब्याचे नुकसान झाले होते. या नुकसानाचा सर्व्हे सुरू असतानाच १३ फे ब्रुवारीला दुपारी पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट झाली. सोनार गव्हाण, नायगाव दत्तापूर, शेंदला, सावत्रा, मोसंबेवाडी, कल्याणा, अकोला ठाकरे, खामखेड, हिवरा साबळे, रायपूर, हिवरा आश्रम, अंजनी बु.,  देऊळगाव माळी, गौढाळा, कंबरखेड, शेलगाव देशमुख, भालेगाव, साब्रा, गोहगाव दांदडे, पांगरखेड या भागाला फटका बसला. गवंढाळा, कंबरखेड येथे सरपंच गजानन जाधव, उपसरपंच संदीप खरात, शरद धोंडगे, प्रल्हाद काळे, पंजाबराव धोंडगे, प्रदीप वसू, संदीप जाधव, बबन धोंडगे, राहुल जाधव, परमेश्‍वर धोंडगे, गणेश खरात, डिगांबर धोंडगे, गजानन खरात, या अन्य शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. 

हिवरा आश्रम परिसरातील नऊ गावात गारपीट
हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम परिसरातील नऊ गावांमध्ये मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पीक हातचे गेले. हिवरा आश्रमसह गरजखेड, दुधा, ब्रम्हपुरी, रायपूर, देऊळगाव माळी, नागझरी, बार्‍हई, नांद्रा धांडे या भागाला मोठा फटका बसला. दुपारी अचानक गारपीट झाल्याने नागरिकांचीही मोठी धांदल झाली. 
मेहकर तालुक्यातील नागझरी येथील मोहन देवकर आणि निर्मला देवकर गारपिटीदरम्यान, शेतात काम करीत असताना जखमी झाले. दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ब्रम्हपुरी येथील अशोक कांबळे यांची शेळी गारपिटीदरम्यान ठार झाली. या अस्मानी संकटामुळे शेतकरी धास्तावलेले आहेत.

चिखली तालुक्यात पुन्हा गारपीट
 १३ फेब्रुवारी रोजी गारपीट अवकाळी पावसाने पुन्हा एका तालुक्यातील गावांना तडाखा दिल्याने यामध्ये तालुक्यातील सुमारे ११ गावांतील शेती मोठय़ा प्रमाणावर बाधित झाली आहे. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यातील गोद्री, चांधई, वळती, सवणा, मुंगसरी, तेल्हारा, शे.जहागीर, भोरसा-भोरसी, पाटोदा, खंडाळा मकरध्वज, भानखेड, पळसखेड दौलत या गावात गारपिटीने पुन्हा एकदा तडाखा दिल्याने शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ११ फेब्रुवारीच्या पावसाने आडवी झालेली पिके आजच्या गारपिटीने पार नेस्तनाबूत झाली आहेत. 
या गारपिटीने झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच तहसीलदार मनिषकुमार गायकवाड व प्रशासनातील अधिकार्‍यांनी तातडीने काही नुकसानग्रस्त गावात भेटी देऊन पाहणी केली. तर भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सतीश खबुतरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काळे, नगरसेवक गोपाल देव्हडे आदींसह पदाधिकार्‍यांनी पळसखेड दौलत व परिसरातील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. दरम्यान, ११ फेब्रुवारीच्या नुकसानाचा पंचनामा सुरू असतानाच आज पुन्हा एका पावसाने तडाखा दिल्याने नुकसानात भर पडली आहे. 

सिंदखेडराजा : गुंज, वरोडी परिसरात  पुन्हा गारपीट
साखरखेर्डा परिसरातील गुंज, वरोडी, सवडद, शेवगा जहागीर, शेलगाव काकडे, सावंगी भगत शिवारात गारांसह पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याअगोदर ११ ला गारपीट झाली असताना पटवार्‍यांनी सर्व्हे केला नाही, त्यामुळे या गावांचाही वस्तुनिष्ठ सर्व्हे करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. 
११ फेब्रुवारीला साखरखेर्डा परिसरातील गोरेगाव, काटेपांग्री, उमनगाव, सायाळा, गुंज, वरोडी, सावंगी भगत, गुंजमाथा, बाळसमुद्र, शेंदुर्जन परिसरात गारांसह पाऊस झाला होता; परंतु पटवारी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत न गेल्याने ही गावे शासकीय यादीत आली नाहीत. आज पुन्हा दुपारी ५ वाजता गारांसह पाऊस झाल्याने सवडद, गुंजमाथा, गुंज, वरोडी, सावंगी भगत, उमनगाव या शिवारात आज पुन्हा गारांसह पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या पिकांचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा युवा आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अंकुर देशपांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे यांनी केली आहे. 

Web Title: Three Talukas hit again in Buldhana district; Both injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.