बुलडाणा लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:05 PM2018-09-15T14:05:35+5:302018-09-15T14:14:13+5:30

बुलडाणा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण खलबते होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.

NCP's lobbying for Buldana Lok Sabha seat | बुलडाणा लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी

बुलडाणा लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी

Next

- नीलेश जोशी
बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही काळापासून जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सक्रीयता वाढवली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुढील महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात येत असल्याने बुलडाणा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण खलबते होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे.
आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत झालेल्या पक्षांतर्गत बैठकीत शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभा मतदार संघातील एकंदर स्थितीबाबत कोअर कमिटी सदस्यांकडून सुमारे २० मिनीट सविस्तर आढावा घेतला होता. त्यामुळे आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वाट्याला येणार्या या मतदार संघात राष्ट्रवाडी ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत तथा आंदोलनातून आगामी काळातील निवडणुकीचे संकेत दिल्या गेले होते. दुसरीकडे विदर्भात प्रामुख्याने बुलडाणा, गोंदिया-भंडारा आणि अमरावती या तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आघाडीत येतात. दरम्यान, अकोल्याची जागा राष्ट्रवादीला देऊन बुलडाणा लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी या दृष्टीने उभय पक्षामध्ये सध्या मंथन सुरू आहे. राष्ट्रवादीने जागा वाटपाचा ५०-५० फॉर्म्युला काँग्रेसला दिला असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांच्या ताकदीच्या आधारावर जागा वाटप होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात बुलडाणा लोकसभा मतदार संघासंदर्भातील चर्चा काय वळण घेते याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे पुढील महिन्यात २४ आॅक्टोबरला माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त सर्व पक्षीयांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास शरद पवार हे बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. मात्र या कार्यक्रमापेक्षा ते काय वक्तव्य करतात आणि पक्षांतर्गत काय खलबते होतात, याकडेच राजकीय जाणकाराचे लक्ष लागून आहे.
बुलडाणा कायम चर्चेत
राष्ट्रवादीचा बुलडाणा लोकसभेवर दावा आहे, काँग्रेसलाही ही जागा आपल्याकडे असावी, असे वाटते. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच स्वाभीमानी शेतकरी संघटनेलाही बुलडाणा लोकसभेत प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना उभे करायचे आहे. स्वाभीमानीची अलिकडील काळात आघाडीतील पक्षांशी झालेली जवळीक पाहता आगामी काळात बुलडाणा लोकसभा मतदार संघाची जागा कायम चर्चेत राहणारी ठरणार आहे. ‘सुजलाम सुफलाम बुलडाणा‘ आणि दहीहंडीमधील काँग्रेस जिल्हाध्यक्षांसोबतची तुपकरांची सेल्फी ही भविष्यातील काही नव्या राजकीय संबंधांनातर जन्म देणार नाही ना? अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे येथील उमेदवार असल्याचे निश्चितच मानल्या जात आहे. त्यातच काँग्रेसच्या महागाईविरोधातील देशव्यापी बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व काँग्रेसचे सचिव हर्षवधन सपकाळ हे बंदच्या आवाहनादरम्यान एकाच दुचाकीवर बसले होते. त्यामुळेही बुलडाण्याची जागा कोणाला या चर्चेला उधान आले आहे.

गणेशोत्सवानंतर बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसची गणेशोत्वस तथा दुर्गाउत्सवानंतर पुन्हा एकदा कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे. प्रसंगी ती आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर तथा ५०-५० फॉर्म्युल्यावर अधिक सविस्तर चर्चा होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: NCP's lobbying for Buldana Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.