बाजार समितीचे उपबाजार बंदच !

By admin | Published: August 31, 2014 12:39 AM2014-08-31T00:39:09+5:302014-08-31T00:43:38+5:30

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्नीत उपबाजार बंद स्थितीत आहेत.

Market committee's sub-market closed! | बाजार समितीचे उपबाजार बंदच !

बाजार समितीचे उपबाजार बंदच !

Next

खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संलग्नीत बोरीअडगाव व पिंपळगाव राजा येथील उपबाजार बंद स्थितीत आहेत. या भागातील शेतकर्‍यांसाठी सुविधा म्हणून चालू करण्यात आलेल्या या उपबाजारातील लाखो रुपयांच्या इमारती धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे बंद असलेल्या या उपबाजाराला पुर्ववत सुरु करण्यासाठी नवसंजिवनीची गरज आहे.
शेतकर्‍यांच्या माल विक्रीसाठी तसेच जनावरे विक्रीकरिता खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव सज्ज आहे. मात्र तालुक्यातील शेवटच्या टोकावरुन तसेच इतर तालुक्यातील शेतकर्‍यांना खामगावला येणे जाणे दुरचे होते. याचा विचार करुन शेतकर्‍यांना त्यांचा माल विक्रीसाठी परिसरातच धान्य बाजार व कापसाची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने शासकीय स्तरावरुन प्रयत्न करण्यात आले. बोरीअडगाव व पिंपळगाव राजा या ठिकाणी उपबाजाराची निर्मिती करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी धान्य बाजार सुरुवातही झाली.
खामगाव तालुका हा कापसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. शेतकर्‍यांना खामगावला कापूस विक्रीसाठी जाणे दूर पडत होते.त्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने १५ फेब्रुवारी १९८४ रोजी बोरीअडगाव येथे जिनिंग फॅक्टरीचे उद्घाटन झाले. जिनिंग सुरुझाली. बोरीअडगाव येथे रुईच्या गाठी बनत होत्या. तसेच २00 ते २५0 मजुरांना कापूस संकलन केंद्रावर रोजगारही मिळत होता. बोरीअडगाव येथे शेतकर्‍यांना जाणे येणे सोयीचे म्हणून या भागातील ३0 ते ३५ खेड्याची नाळ बोरीअडगावशी जोडलेली आहे. शेतकर्‍यांची वाढती संख्या पाहता येथे राज्य शासनाच्या वतीने बचत भवन, शेतकरी निवासाची व्यवस्था करण्यात आली. लाखो रुपयाच्या इमारती बांधण्यात आल्या. कापूस पणन महासंघाची कापूस खरेदी असे पर्यंत येथे रेलचेल होती. मात्र पणन महासंघाची कापूस खरेदी बंद होताच उपबाजारावर अवकळा आली. धान्य बाजारालाही व्यापार्‍यांचा फारसा प्रतिसाद नसल्याने तो बंद पडला व सद्यास्थितीत केवळ इमारतीच उभ्या आहेत. परिणामी उपबाजारासाठी असलेली जागा व इमारती सध्या धुळखात पडल्या आहेत.
बोरीअडगाव व पिंपळगाव राजा येथील उपबाजार पूर्ववत सुरु करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. मात्र व्यापार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून आला नाही. तर शेतकर्‍यांचा ओढाही खामगाव येथील कृउबासकडे वाढल्याने हे दोन्ही उपबाजार मागे पडले असल्याचे कृउबासचे मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख यांनी सांगीतले.
* जिनींग फॅक्टरीला अखेरची घरघर!
बोरीअडगाव येथे कापूस संकलन केंद्रावर शेतकर्‍यांची गर्दी नेहमीच झाली होती. कापूस खरेदीच्या ३ ते ४ महिन्याच्या कालावधीत तसेच नंतर रुईच्या गाठी बनेपर्यंत जिनिंग फॅक्टरी उकाळून निघत होती. मजुरवर्गालाही रोजगार मिळत होता. मात्र पणन महासंघाची कापूस खरेदी बंद झाल्यानंतर शेतकर्‍यांचा कापूस खाजगी व्यापार्‍याकडे जावू लागला व येथेच जिनिंग फॅक्टरीला अखेरची घरघर लागली. आज जिनींग फॅक्टरी भंगारात पडलेली आहे.

Web Title: Market committee's sub-market closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.