कोरोनामुळे पोळा सणावर निर्बंधांची झूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:59 AM2020-08-18T10:59:44+5:302020-08-18T11:00:40+5:30

वाजत गाजत बैलांची मिरवणूक, देवदर्शन, स्पर्धा अशा अनेक परंपरांना खंड पडणार आहे.

Corona imposses restrictions on Pola festival! | कोरोनामुळे पोळा सणावर निर्बंधांची झूल!

कोरोनामुळे पोळा सणावर निर्बंधांची झूल!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्ग पाहता यंदा जिल्ह्यातील पोळा सण साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोळा भरण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते; ही गर्दी टाळण्यासाठी या सणावर निर्बंधाची झूल घालण्यात आली आहे. वाजत गाजत बैलांची मिरवणूक, देवदर्शन, स्पर्धा अशा अनेक परंपरांना खंड पडणार आहे.
मेहकर शहरात साजरा होणारा ट्रॅक्टर पोळाही यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या २ हजार २५२ वर गेली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून यंदा सण, उत्सव घरातच साध्या पद्धतीने साजरे करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. पोळा हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण. मात्र कोरोनामुळे या उत्सवावरही विरजण पडले आहे. पोळा सण साजरा करण्यावरही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पोळा साजरा न करता घरीच बैलांची पूजा करून हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नियोजित व पारंपरीक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
कोलवड येथे एक दिवस आधीच पोळा

बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे मंगळवारच्या ऐवजी सोमवारी एक दिवस अगोदरच पोळा सण साजरा करण्यात आला. १७ आॅगस्ट रोजी पाऊस जास्त असल्याने या गावाला पाणी लागले होते. अनेक रस्ते बंद झाले होते. त्यामुळे बैल गावात येऊ शकले नाही. याठिकाणी सर्वांनी आपआपल्या घरीच बैलाचे पूजन करून साध्या पद्धतीने हा सण साजरा केला.


मेहकरचा ट्रॅक्टर पोळा दसऱ्याला?
आधुनिकतेच्या या युगात अनेक शेतकऱ्यांकडील बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे अशा शेतकºयांनी मेहकर येथे एक आगळावेगळा ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याचा पायंडाच पाडला आहे. आपल्याकडे असलेल्या ट्रॅक्टरचा अनोखा पोळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. सर्व ट्रॅक्टर मालकांना एकत्र करून ट्रॅक्टरचा अनोखा पोळा याठिकाणी भरवण्यात येतो. बैल पोळ्या प्रमाणे तोरण बांधून ट्रॅक्टरला सजवून ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात येते. परंतू कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ट्रॅक्टर पोळाही यंदा रद्द करण्यात आला आहे. पुढे कोरोनाचा विळखा कमी झाल्यास दसºयाला ट्रॅक्टर पोळा भरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Web Title: Corona imposses restrictions on Pola festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.